-->

24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार

24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेवून नियोजन करावे


- पणन मंत्री जयकुमार रावल


24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार


मुंबई, दि.23 : राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया उद्या (दि.24 जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी. तसेच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण  येणार नाही याची काळजी घ्यावी. असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.


हमी भावाने 300 केंद्रावरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे तूर खरेदी प्रक्रिये संदर्भातील आढावा बैठक झाली. बैठकीस एन.डी.श्रीधर दुबे पाटील, कार्यकारी संचालक (मार्फेड), भाव्या आनंद, राज्यप्रमुख (नाफेड),प्रशांत बसवकर, उपव्यस्थापक, एमएसडब्लुसी, डी.आर.भोकरे, व्यवस्थापक(मार्फेड) यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


‘नाफेड’ अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन तसेच विर्दभ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थाच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.


पणन मंत्री श्री. रावल म्हणाले की, राज्यभरात सुरवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतक-यांना विनाअडथळा तूर खरेदी नोंदणीची तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यात तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी यंत्रणेने घ्यावी. वेअर हाऊसिंग कार्पोरेशनने  खरेदी प्रक्रियेतील काम जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पेमेंट जमा करण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. याकामी अधिकचे मनुष्यबळ लागत असल्यास त्याची व्यवस्था करावी. त्याचसोबत खरेदी केंद्रांवर शेतकऱ्याना पाण्याची,बसण्याची सुयोग्य व्यवस्था, तक्रार निवारण केंद्राची सुविधा उपलब्ध करावी. याठिकाणी शेतक-यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. जिल्हा मार्कैटिंग अधिकारी यांनी या सर्व बाबींचे नियंत्रण करुन तक्रारींचे निवारण करावे. तूर खरेदीच्या दृष्टीने वेअर हाऊसची नियोजन व्यवस्था तयार ठेवावी. त्यासाठीची आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतक-यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात यावी. शेतक-यांनी डेटा एन्ट्री केल्या नंतर पुढच्या 72 तासात नाफेड मार्फत नियमानुसार त्यांना पैसे प्राप्त होतील, याची काळजी घ्यावी. खरेदी नोंदणीची तसेच खरेदी सुरु झाल्यानंतर त्या बाबतची प्रक्रिया गतीने सुव्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या सूचना यावेळी पणन मंत्री श्री.रावल यांनी दिल्या.


०००


वंदना थोरात/विसंअ


क्र. 313


उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 42 कामांना प्रशासकीय मान्यता;


9 बांधकामे पूर्ण


मुंबई, दि. 23 : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल प्राप्त करून देणाऱ्या विभागापैकी तिसरा महत्वाचा विभाग आहे. या विभागातील निरीक्षक व अधिक्षकांच्या कार्यालयांचे बांधकाम टाईप प्लॅननुसार करण्यात येत आहे. शासनाने विभागाच्या राज्यातील 42 ठिकाणच्या विविध बांधकामासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यापैकी 9 बांधकामे पूण झालेली आहेत.


            पूर्ण झालेल्या बांधकामांमध्ये राज्य उत्पादन शुल्क भवन मुंबई, नाशिक अधिक्षक यांचे निवासस्थान, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जालना, हिंगोली, अमरावती, कर्मचारी निवासस्थान वाशिम, निरीक्षक कार्यालय संरक्षक भिंत तळेगांव दाभाडे जि. पुणे, निरीक्षक कार्यालय व निवासस्थान संगमनेर जि. अहिल्यानगर, भरारी पथक निरीक्षक कार्यालय सटाणा जि. नाशिक यांचा समावेश आहे. विभागातील सर्व कार्यालये अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


            राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नविन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. विभागासाठी मंजूर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या 3 हजार 842 इतकी आहे. विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण अंदाजे 23,289 कोटी  इतका महसूल प्राप्त झाला आहे. विभागाची आयुक्त कार्यालयाची फोर्ट, मुंबई येथे सात मजली इमारत असून या इमारतीच्या बांधकामास सन 2024 ची उत्कृष्ट शासकीय इमारत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गत 4 ते 5 वर्षापासून या विभागातील जिल्हा व उपविभागीय स्तरावरची बांधकामे सुरू आहेत. शासनाने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी उत्पादन शुल्क विभागातील बांधकामासाठी 110.47 कोटी निधीची तरतूद केली आहे.   


००००


निलेश तायडे/विसंअ


क्र. 312


ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय

बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द

- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर

महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल


 मुंबई , दि. 23 : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांना यश येत आहे, उमेद अभियानांतर्गत स्थापित शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांना किंवा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार - आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे संमेलन सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निलेश सागर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, उपसंचालक  संदीप जठार,अभियानाचे अवर सचिव  धनवंत माळी,  उपसंचालक  मनोज शेटे  यांच्यासह FDRVC चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन बिहारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी चे उपसचिव  उपस्थित होते.


मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश सागर म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या शुद्धता, गुणवत्ता आणि पारंपरिकतेला आम्ही प्राधान्य देत आहोत. तसेच, ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिला उद्योजकता वाढवण्यासाठी नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत."


उमेद अभियानाच्या यशस्वी कामगिरीबाबत श्री. सागर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या ४५० पेक्षा  जास्त  शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) सक्रिय आहेत. आतापर्यंत ५ लाख स्वयं सहाय्यता समूहांना जवळपास  १,००० कोटींचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बँकांमार्फत ग्रामीण महिलांना ३०,००० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात १९ लाख लखपती दीदी अभियानाने तयार केल्या आहेत असेही श्री.सागर यांनी सांगितले.


उमेद अभियानाचे नवे आयाम


अभियानाचे मुख्य परिचालन  अधिकारी श्री. परमेश्वर राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले, "उमेद अभियान हे फक्त ग्रामीण महिलांसाठी आर्थिक मदतीचे साधन नाही, तर त्यांना सन्मान देणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारे व्यासपीठ आहे. उमेद अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारात पोहोचवणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे. या अभियानाद्वारे ग्रामीण महिलांचे यश भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवा आयाम ठरले आहे.


महालक्ष्मी ट्रेड सरस प्रचंड यशस्वी


राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले. तसेच राज्यभरात उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य वा थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य नफा मिळावा ह्या उद्देशाने एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला हार्वेस्ट प्लसचे, प्रोग्राम मॅनेजर स्वाधीन पटनाईक, ADM चे अमोल धवन,सलाम किसनचे अक्षय खोब्रागडे देहात कंपनीचे अनुराग पटेल असे एकूण विविध कंपनीचे २५ खरेदीदार व ७० महिला शेतकरी उत्पादक यांनी सहभाग नोंदवला. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाची खरेदी विक्री करावी हा प्रमुख उद्देश होता. यामध्ये प्रामुख्याने तूर डाळ, चना डाळ, उडीद डाळ, नाचणी, कांदा, तांदूळ , मिरची, हळद यासारखे ३५ उत्पादनाचा समावेश करण्यात आला. या संमेलनात खरेदी-विक्री मधून दिवसभरात एकूण १.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. या संमेलनात झालेल्या वेगवेगळ्या करारांमधून आणि बोलणीतून भविष्यामध्ये ७ ते ८ कोटीची उलाढाल होणे अपेक्षित आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/


क्र. 311


“मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त कविता स्पर्धेस उत्तम प्रतिसाद


नवी दिल्ली, 23 : राजा शिव छत्रपती शिवाजी......, मनाचे श्लोक......, मराठी महिन्याचे महत्व सांगणारी कविता, माझ्या पप्पांनी गणपती आणला... बहीण माझी छोटीशी.... अशा सुप्रसिद्ध मराठी कविता, गाणी व श्लोक अस्खलितपणे  अमराठी भाषिक विद्यार्थ्यांनी कविता स्पर्धेत सादर केल्या.


‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील नूतन मराठी शाळेत कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंतच्या एकूण 20  विद्यार्थी सहभागी झाले. शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका श्रीमती वर्षा बावने आणि श्रीमती सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला.


अमराठी  भाषिक असणाऱ्या या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता उत्तम रीतीने सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


इयत्ता आठवीच्या वर्गातील निखल या विद्यार्थ्यांने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज..... या कवितेचे अभिनयासह उत्कृष्टपणे सादरीकरण केले.  इयत्ता आठवीतील तन्मय याने आई करना ग भेळ.... ही बाल कविता अभिनयासह सादर केली. तो व्दीतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. इयत्ता सहावीतील अनु या विद्यार्थीनीने मराठी महिन्याचे महत्व सांगणारी  कविता उत्साहात  सादर केली. तर इयत्ता सातवीतील आकांक्षी हिने ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’..... हे गाणे सादर केले. या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.


    या कविता स्पर्धेस परीक्षक म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा,   महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक भागवंती मेश्राम आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "24 जानेवारीपासून राज्यात तूर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article