
जिल्ह्यातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम पूर्ण करा सीईओ वसुमना पंत
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम पूर्ण करा
सीईओ वसुमना पंत
उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव
वाशिम, १० जानेवारी रोजी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड व गोल्डन कार्डचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या ५ लक्ष रुपयांचे विमा कवच असणारे कार्ड वितरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली जात आहे.जिल्ह्यात एकूण ५ लक्ष ८ हजार ३५० पात्र लाभार्थी असून आजपर्यंत ४ लक्ष ८३ हजार ५४८ लाभार्थ्यांना कार्ड वितरण करण्यात आले आहे.कार्ड वितरण मोहिमेमध्ये अमरावती विभागात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक असून राज्यामध्ये ४ थ्या क्रमांक आहे.याबाबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी वेळोवेळी आढावा घेत असून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने विविध उपायोजना केल्या जात आहेत.
आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अशा सेविका,आरोग्य सेवक आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यामध्ये सामुदायीक वैद्यकीय अधिकारी डॉ.संध्या मोरे,डॉ.मोहम्मद रसूल शेख,आरोग्य सेवक सुरेंद्र उमक, मारोती इंगळे,जऊळका येथील आशा सेविका गंगा नवघरे,धनज (बु.) येथील आशा सेविका विद्या तिरमारे,मोहरी येथील आशा सेविका विमल करवते व किन्हीराजा येथील आशा सेविका वैशाली तारक यांचा समावेश आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे,आशा सेविका जिल्हा समन्वयक जगदीश पवार व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समनवयक डॉ.रंजीत सरनाईक यांची उपस्थिती होती.
0 Response to "जिल्ह्यातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम पूर्ण करा सीईओ वसुमना पंत "
Post a Comment