
लिंग चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश ! वाशिम आरोग्य विभागाची प्रशंसनीय कारवाई !
साप्ताहिक सागर आदित्य
लिंग चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश !
वाशिम आरोग्य विभागाची प्रशंसनीय कारवाई !
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे वाशिम, कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयावर १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या छाप्यात रुग्णालयात ५ गर्भवती महिला गर्भलिंग निदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले.
या महिलांपैकी २ महिला बुलढाणा जिल्ह्यातील, २ अकोला जिल्ह्यातील आणि १ महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील होती.
आरोग्य विभागाला लिंग निदान होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, ६ सदस्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले.
तिथे तिची भेट एका एजंटशी झाली, ज्याने तिला लिंग निदानाची हमी देत २०,००० रुपयांची मागणी केली. त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोग्य विभागाने तत्काळ छापेमारी केली. छाप्यादरम्यान, पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली आणि एजंटकडून ७०,५०० रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल जप्त केले.
सोनोग्राफी मशीनद्वारे बाळाचे लिंग निश्चित करण्यासाठी आणि ते उघड करण्यासाठी प्री-कन्सेप्टन प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अकोला व वाशिम चमुमधील डॉ. विजया पवणीकर , डॉ. धनंजय चिमणकर , डॉ. एन . आर.साळुंखे, डॉ. एस. एम. जाधव, ॲड. शुभांगी ठाकरे, ॲड. राधा नरवलिया, ओम राऊत यांच्या पथकाने राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलच्या डॉ. रजनी राठोड
एजंट माधव ठाकरे आणि चालक संदिप नवघरे यांचे विरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई केली.
गर्भ लिंग चाचणीचा पर्दाफाश करणारे शिलेदार !
सदरील कार्यवाही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,
उपसंचालक (अकोला) डॉ. भंडारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांचे मार्गदर्शनात ही मोठी कारवाई करण्यात आली.
प्रसूतिपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे; परंतु त्यानंतरही लपून-छपून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे. यावर आळा घालण्यासाठी बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५, १०४ जारी केला आहे. संबंधित डॉक्टर किंवा त्या रुग्णालयाची तक्रार करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
डॉ. अनिल कावरखे
जिल्हा शल्य चिकित्सक,
वाशिम
0 Response to " लिंग चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश ! वाशिम आरोग्य विभागाची प्रशंसनीय कारवाई ! "
Post a Comment