
वाकद व मोप मंडळात अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी केली पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
वाकद व मोप मंडळात अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी केली पाहणी
वाशिम, दि. २३ जुलै रिसोड तालुक्यातील वाकद व मोप मंडळातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्ते व पूलही बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी या संपूर्ण भागाची सखोल पाहणी केली.
वाकद, गोहगाव हाडे, बाळखेड, पिंपरखेड, शेलूखडसे या गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक अहवालानुसार या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गोहगाव गावात जाण्यासाठी सहा किलोमीटरचा खडतर रस्ता असून, त्या मार्गावर लेंडी नाला, खराटी नाला व विद्रुपा नदी हे तीन प्रमुख प्रवाह पार करावे लागतात. पावसाळ्यात या नाल्यांमुळे गावाचा संपर्क तुटतो. विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य ग्रामस्थांना याचा मोठा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर संबंधित पूल व रस्त्यांची पाहणी करून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीने पूल व रस्त्यांच्या कामांसाठी हालचाली सुरू करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी व रिसोड तहसीलदारांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना पूरस्थितीत आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. बाळखेड येथील नदीवरील पूल परिसरात पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी तातडीने संपर्क साधून कारवाई सुरू करण्यात आली. तसेच शेती नुकसानीचा आढावा घेऊन योग्य ती सर्वेक्षण कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
या दौर्यात निवासी नायब तहसीलदार एस. बी. जाधव, वाकद मंडळाचे मंडळ अधिकारी ए. व्ही. लहाने, ताकदचे तलाठी जी. जी. गरकळ, अक्षय जाधव, बाळखेडचे तलाठी के. एस. धांडे, वाडी वाकदच्या काष्टे मॅडम, शेलूखडसेचे तलाठी के. पी. डुकरे, तसेच पोलीस पाटील मिलिंद हाडे, सरपंच विकास हाडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "वाकद व मोप मंडळात अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी केली पाहणी"
Post a Comment