-->

भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून वाशिम 'झेडपी'चे मूल्यमापन!  '१०० डेज' उपक्रम; विभागात वाशिम अव्वल

भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून वाशिम 'झेडपी'चे मूल्यमापन! '१०० डेज' उपक्रम; विभागात वाशिम अव्वल



 साप्ताहिक सागर आदित्य 

भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून वाशिम 'झेडपी'चे मूल्यमापन!

'१०० डेज' उपक्रम; विभागात वाशिम अव्वल

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य शासनाकडुन ‘१०० डेज’ उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी अॅक्शन प्लॅन आखला होता. त्यानुसार सर्वच विभाग प्रमुखांनी या उपक्रमांमध्ये झोकून दिले होते. त्याचेच फलित म्हणून वाशिम जिल्हा परिषद अमरावती विभागातून अव्वल ठरली. या पार्श्वभूमीवर मूल्यमापन करण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय) पथक बुधवारी जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. या पथकाने प्रत्येक उपाययोजनेचे मूल्यमापन केले.

मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच देवेंद्र फडणवीस यांनी '१०० डेज' हा उपक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कामाला लागण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते. यानंतर विलंब न करता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत शंभर दिवसांचा अॅक्शन प्लॅन आखला. त्यानुसार कामकाज सुरू करण्यात आले. अनेक योजनांमध्ये वाशिम जिल्हा परिषद आघाडीवर राहिली. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी राज्यस्तरावर अंतिम निवडीसाठी वाशिम जिल्हा परिषदेची शिफारस केली होती. याच पार्श्वभूमीवर उपक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय) अत्कर्ष अग्रवाल यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी दाखल झाले. या पथकाने प्रत्येक उपाययोजनेचा आढावा घेतला. महात्मा फुले सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सीईओ वाघमारे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले. त्यामुळे विभागस्तरावर अव्वल ठरलेली वाशिम जिल्हा परिषद राज्यस्तरावर कोणत्या क्रमांकापर्यंत झेपावते हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. यावेळी सीईओ वैभव वाघमारे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल भोरखडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक श्रीराम कुळकर्णी, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे व इतर विभाग प्रमुख उपस्थित उपस्थित होते.

काय आहे 'क्यूसीआय'

भारतीय गुणवत्ता परिषद (क्युसीआय) ही एक राष्ट्रीय संस्था आहे. जी भारताच्या गुणवत्ता आणि मानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी काम करते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील उद्योग आणि सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या उत्पादनांची गुणवत्ता स्थापित करणे आहे.

----------------------------------------

सात निकषांवर तपासणी: 

केंद्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत Quality Council of India (QCI) द्वारे जिल्हा परिषदेची तपासणी करताना खालील प्रमुख निकषांवर आधारित तपासणी करण्यात आली.

1. प्रशासकीय कार्यक्षमता: यामध्ये कार्यालयीन कामकाजाची गती आणि प्रलंबित प्रकरणांचे निराकरण, सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत केलेली प्रगती, अभिलेखांचे डिजिटलायझेशन आणि सुसूत्रीकरण यांचा समावेश होतो.

2. नागरिक-केंद्रित सेवा: सनद वितरण यासारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकशाही दिन किंवा ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणेद्वारे तक्रारींचे निराकरण, नागरिकांच्या समस्यांवर त्वरित कारवाई आणि सकारात्मक दृष्टिकोनाला प्रोत्साहन.

3. पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता: शाळांमध्ये CCTV यासारख्या सुविधांची स्थापना आणि देखभाल, स्वच्छता सुविधा (उदा., शौचालये) आणि कार्यालयीन परिसराची स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधांचा आढावा.

4. गुणवत्ता मानके आणि प्रमाणन: भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मानकांनुसार (उदा., ISO 9001, ISO 14001) गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे पालन, शिक्षण, आरोग्य, आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये गुणवत्ता मानकांचे पालन.

5. योजनांची अंमलबजावणी आणि नाविन्य: वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट (ODOP) किंवा GI टॅगिंग यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, जिल्हा परिषदेद्वारे राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मूल्यमापन, उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न.

6. डेटा आणि अहवाल सादरीकरण: तपासणी अहवाल, प्रगती अहवाल, आणि छायाचित्रांसह (जिओ-टॅगिंगसह) सविस्तर माहिती सादर करणे, कार्यालयीन वेबसाइट अद्ययावत ठेवणे आणि माहितीच्या अधिकार (RTI) कायद्याचे पालन.

7. सहभाग आणि जबाबदारी:  सर्व संबंधित शासकीय कार्यालयांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि नियोजन क्षमता.

-----------------------------------

लोकाभिमूख आणि पारदर्शक प्रशासनाची दखल:

सीईआहे वैभव वाघमारे यांनी वाशिम जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेताच आपल्या कार्यशैलीचा परिचय दिला. सर्व कर्मचाऱ्यांना वेळेचे कठोर बंधन घालुन त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. ग्रामिण भागात राहणाऱ्या गरीब, शेतकरी आणि वंचित घटकातील लोकांचे जीवनमान उंचविण्यासाठी श्री वाघमारे यांनी कंबर कसुन आणि झोकुन देऊन काम केले. एक कर्तव्यतत्पर, आणि प्रामाणिक अधिकारी म्हणुन जिल्ह्यातील लोकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी राबविलेल्या उपक्रम विभाग आणि राज्यस्तरावरही उल्लेखनीय ठरले आहेत. त्यामध्ये बोलकी अंगणवाडी आणि शाळा, महिन्याच्या दर तिसऱ्या गुरुवारी तक्रार निवारण दिन, आणि ग्रामविकासाकरीता आखलेला अकरा कलमी कार्यक्रम यांचा समावेश आहे. लोकाभिमूख आणि पारदर्शक प्रशासक म्हणुन त्याचा लौकिक राज्यभर आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (क्युसीआय) तपासणी पथकांनी या उपक्रमांची नोंद घेतली.


Related Posts

0 Response to "भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडून वाशिम 'झेडपी'चे मूल्यमापन! '१०० डेज' उपक्रम; विभागात वाशिम अव्वल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article