
डिजिटल युगात प्रत्येकाने सजगता बाळगावी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे
साप्ताहिक सागर आदित्य
डिजिटल युगात प्रत्येकाने सजगता बाळगावी
जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे
सुरक्षित इंटरनेट दिवस: ऑनलाईन सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल
वाशिम,
सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, त्याचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावरील अपप्रचार यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक असले पाहिजे.सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात घुगे बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब दराडे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सागर हवालदार म्हणाले,
"इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत सायबर सुरक्षेचे महत्त्वही वाढले आहे. सुरक्षित इंटरनेट दिवस हा जनजागृतीसाठी उत्तम संधी आहे. नागरिकांनी सायबर स्वच्छता पाळावी, संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती सावधगिरीने शेअर करावी आणि सायबर गुन्ह्यांची त्वरित तक्रार नोंदवावी.डिजिटल साक्षरता वाढवून आपण 'सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेट वापरकर्ता' बनू शकतो. सुरक्षित इंटरनेट हेच डिजिटल प्रगतीचे लक्षण आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच 'स्मार्ट वापरकर्ते, सुरक्षित इंटरनेट' या तत्वानुसार इंटरनेटचा सकारात्मक आणि जबाबदारीने उपयोग करावा.
डिजिटल युगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला तरी, सायबर सुरक्षेचे प्रश्नही गंभीर बनत आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी ‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ११ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरक्षित इंटरनेट दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षित वापर करण्यासाठी जनजागृती करणे. सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, बालसुरक्षा, डिजिटल प्रायव्हसी आणि इंटरनेट आचारसंहिता यासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा भाग आहे.
सहाय्यक सुचना व विज्ञान अधिकारी नेमसिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी पीपीटीव्दारे सुरक्षित पासवर्ड वापरा – कमजोर पासवर्ड टाळा आणि मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा. फिशिंग हल्ल्यांपासून सावध रहा – संशयास्पद ई-मेल किंवा मेसेजवर क्लिक करू नका. सोशल मीडियावर माहिती शेअर करताना काळजी घ्या – वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या शेअर करू नका.सुरक्षित वाय-फाय नेटवर्क वापरा – सार्वजनिक वाय-फाय वापरताना व्हीपीएनचा वापर करा. सायबर गुन्ह्यांबद्दल तक्रार करा – फसवणूक झाल्यास सायबर क्राईम पोर्टल किंवा पोलिसांकडे तक्रार करा. आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान केंद्र (एनआयसी) वाशिमचा पुढाकार :
सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या अनुषंगाने नॅशनल इन्फॉरमेटिक्स सेंटर अर्थात राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र (एन आय सी), वाशिम यांच्या वतीने सायबर सुरक्षा कार्यशाळा, डिजिटल साक्षरता मोहीम आणि सायबर गुन्हे प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
सुरक्षित इंटरनेट दिवस हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेट वापराची गरज अधोरेखित करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. अश्या मार्गदर्शक सूचना दराडे यांनी उपस्थितांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व आभार शाहु भगत यांनी मानले.
0 Response to "डिजिटल युगात प्रत्येकाने सजगता बाळगावी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे"
Post a Comment