
पालकांच्या समर्पणाने जपली महाविद्यालयाची यशाची परंपरा
साप्ताहिक सागर आदित्य
पालकांच्या समर्पणाने जपली महाविद्यालयाची यशाची परंपरा
अथक प्रयत्नांनी सजवली यशस्वी विद्यार्थ्यांची स्वप्ने
वाशिम : स्थानिक श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.एस.डब्ल्यू अभ्यासक्रमात गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा त्यांच्या गावी जाऊन सन्मान करण्यात आला. श्री सरस्वती प्रगत विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. एस.एन.कोठारी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आणि मनोज कोठारी यांच्या प्रयत्नातून आणि प्राचार्य डॉ. संदिप शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या गुणवंत विद्यार्थी - पालक सन्मान सोहळ्यात विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या दोघांच्याही अथक प्रयत्नांची कहाणी उलगडली गेली. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले, त्यांचा महाविद्यालयाने मनोभावे सन्मान केला.
सदर गुणवंत विद्यार्थी - पालक सन्मान सोहळ्याला श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उद्धव जमधाडे, प्राध्यापक डॉ. रविंद्र मडावी , प्रा. उद्धव बनकर , प्रा. ज्ञानेश्वर गोरे , प्रा. अश्विन काकडे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नेत्रदीपक यश संपादन करीत अनुक्रमे दुसरे , चौथे , सातवे , आठवे , नववे स्थान प्राप्त करणाऱ्या युवराज रंगराव राठोड ( पिंप्री हनुमान ) , प्रतिक्षा दिलीप वैद्य ( वारा जहागीर) , वैशाली सुदाम चव्हाण (पिंप्री हनुमान) , स्नेहा अरुण तिहिले ( कोलार ) , ऐश्वर्या कैलास रूपावत ( वारा जहागीर) या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचा त्यांच्या गावी जाऊन सन्मान करण्यात आला.
"विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे अथक प्रयत्न आणि समर्पण हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या यशासाठी जी मेहनत घेतली आहे ती अविस्मरणीय आहे." असे मत याप्रसंगी माजी प्राचार्य उद्धव जमधाडे यांनी व्यक्त केले. " आमच्या यशामागे पालकांचे अथक समर्पण आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो असे मत गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या सन्मान सोहळ्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या मनात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
0 Response to "पालकांच्या समर्पणाने जपली महाविद्यालयाची यशाची परंपरा "
Post a Comment