
नॉयलॉन मांजा बंदीची होणार काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक शहरात विशेष पथकांची नेमणूक उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
साप्ताहिक सागर आदित्य
नॉयलॉन मांजा बंदीची होणार काटेकोर अंमलबजावणी
प्रत्येक शहरात विशेष पथकांची नेमणूक
उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
वाशिम, : नॉयलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील प्रत्येक शहरात विशेष पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नॉयलॉन मांजा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पतंग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाच्या उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयातीवर पुर्णपणे बंदी आहे. असे असतांना देखील विदर्भात नॉयलॉन मांजाचा सर्रास उपयोग केला जात आहे. व्यापारी नॉयलॉन मांजाची लपुन छपून विक्री करीत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची गांभीर्याने दखल घेऊन नॉयलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शहरात विशेष पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. या विशेष पथकांनी नॉयलॉन मांजा बंदीविषयी व्यापक जनजागृती करणे व बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी (महसुल), सर्व तहसिलदार व नगर पालिका प्रशासन शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांचा समावेश असणार आहे. नॉयलॉन मांजाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करुन विशेष पथकांनी आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी एका आदेशाव्दारे दिले आहे.
0 Response to "नॉयलॉन मांजा बंदीची होणार काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक शहरात विशेष पथकांची नेमणूक उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई "
Post a Comment