
जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष मोहीम ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष मोहीम
३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम
दिनांक १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यातील गावे सतत हागणदारीमुक्त ठेवण्याकरिता ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना राज्यस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सदर मोहिमेस प्रारंभ झाला आहे. याबाबत जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी पुर्व तयारी म्हणुन जिल्हा व तालुका चमुची २ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती.
कोणते उपक्रम राबवणार?
१९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक शौचालय दिन राबविला जातो. त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यात दि. ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान जागर स्वच्छतेचा ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यादरम्यान जिल्हा व तालुकास्तरीय बैठका, वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन द्वारे प्राप्त अर्जावर कारवाई करणे, प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान वितरित करणे, एक खड्डा शौचालयाचे रूपांतर दोन खड्डा शौचालयात करणे, ५०० हुन कमी लोकसंख्या असलेल्या गावात सेप्टिक टॅंक शौचालयाचे मैला गाळ व्यवस्थापनासाठी चर उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील १०
किलोमीटर परिसरातील ५०० हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना नागरी मैला गाळ व्यवस्थापन सुविधेसोबत जोडण्यासाठी नियोजन करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम देखभाल व दुरुस्ती आणि नियमित वापर ही कामे मोहीम स्वरूपात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मोहीम कालावधीत सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा व तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन, संबंधित विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग आदी उपक्रमांद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत स्वच्छतेचा जागर करून उदिष्ट पूर्ण करणेचे अनुषंगाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देतानाच जिल्ह्यातील सर्व गावांनी विशेषत: सरपंचानी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
0 Response to "जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष मोहीम ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम"
Post a Comment