
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नवसंजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावीत – ॲड. निलेश हेलोंडे पाटील
साप्ताहिक सागर आदित्य
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नवसंजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावीत
– ॲड. निलेश हेलोंडे पाटील
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत आढावा बैठक
वाशिम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही केवळ वैयक्तिक हानी नसून, ती समाजव्यवस्थेला हादरवणारी गंभीर समस्या आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक ठरत आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत झालेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण मदतीसाठी अधिक प्रभावी आणि समन्वयात्मक भूमिका घेण्याचे व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्रित आणि समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी आज दि.८ मे रोजी झालेल्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजे वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाहा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी गजानन पडघान , जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार निलेश पळसकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे अनुपालन सादर करण्यात आले.
सहकार व पणन विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम १८ (२) नुसार आठ प्रकरणांमध्ये सावकारांकडे अडकलेली एकूण १५.४ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे. तसेच सद्यस्थितीत एकुण २७ प्रकरणे कार्यवाहीत आहेत.हे अभियान सावकारी मुक्तीसाठी तसेच शेतकरी आत्महत्येच्या घटनांपासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे ॲड. हेलोंडे पाटील यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना स्वावलंबनासाठी व्यवसाय प्रशिक्षण, यंत्रसामग्री व कृषी प्रक्रिया उद्योगांवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. पशुपालकांसाठी चाऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने संयुक्त नियोजन करावे, असे ते यावेळी म्हणाले.
बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाई, रेशीम लागवड, मनरेगा, दुधाळ जनावरे व शेळी वाटप योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान, एकात्मिक फलोत्पादन विकास खरीप हंगाम कर्ज वाटप अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
कृषी विभागाच्या योजना आत्महत्या ग्रस्त कुटुंबांपर्यंत प्राधान्याने पोहोचाव्यात, तसेच सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावेत, असे निर्देशही त्यांनी बैठकीच्या शेवटी दिले. चिया बीज व जलतारा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाचे कौतुक व अभिनंदन यावेळी हेलोंडे यांनी केले.
हेलोंडे पुढे म्हणाले , शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण, सावकारीचा विळखा आणि अपुरा आर्थिक आधार यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत झालेल्या आढावा बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, खरीप हंगामातील कर्जवाटप, तसेच शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात आला. मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी यावेळी बँकांना सूचित केले की, बँकेत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना सौजन्याने आणि आदराने वागणूक द्यावी. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलावीत, असेही ते म्हणाले.
बैठकीचे सादरीकरण विश्वनाथ घुगे यांनी केले.संचालन व आभारप्रदर्शन शाहु भगत यांनी केले.
0 Response to " शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नवसंजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावीत – ॲड. निलेश हेलोंडे पाटील "
Post a Comment