
सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी कर्तव्याच्या भावनेतून पार पाडावी
सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी
कर्तव्याच्या भावनेतून पार पाडावी
साप्ताहिक सागर आदित्य
पालकमंत्री शंभूराज देसाई
डायल 112 मध्ये वाशिम राज्य दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पोलीस अधिक्षकांशी संवाद
वाशिम, : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबत संकटात अथवा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना तातडीने सहाय्य करण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल 112 च्या माध्यमातून पोलीस विभाग काम करीत आहे. वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यात डायल क्रमांक 112 च्या माध्यमातून करण्यात येत असलेले पोलीसांचे कार्य निश्चितपणे अभिनंदनीय आणि कौतूकास्पद आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांच्या मदतीसाठी 24 तास कार्यरत राहून सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीसांनी कर्तव्याच्या भावनेतून पार पाडावी. असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
आज 6 जून रोजी पालकमंत्री देसाई यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पोलीस अधिक्षक कार्यालय येथे वाशिम जिल्हा डायल 112 मध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांचेशी संवाद साधून अभिनंदन केले. यावेळी देसाई बोलत होते. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मीणा हे अमरावती येथून तर पोलीस अधिक्षक कार्यालयातून जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी व उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, यापूर्वी वाशिम भेटीदरम्यान डायल 112 क्रमांकाचा अनुभव आपण घेतला आहे. ज्या व्यक्तीने या क्रमांकावर मदतीसाठी पोलीसांना सहकार्य मागीतले होते. त्या व्यक्तीच्या मदतीसाठी काही मिनिटातच पोलीस पोहचले. त्या व्यक्तीला संबंधित पोलीस स्टेशला आणून सहकार्य केल्याचे आपणाला त्या व्यक्तीने सांगितले. अत्यंत तत्परतेने व तातडीने या क्रमांकाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पोलीसांच्या मुलभूत सोयीसुविधांकडे लक्ष देत आहे. पोलीसांना कर्तव्यकाळात आवश्यकतेनुसार दुचाकी आणि चारचाकी वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. त्याचबरोबर पोलीसांची निवास व्यवस्था व पोलीस स्टेशन इमारती व्यवस्थेच्या कामावर भर देण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
ज्यांना पोलीस विभाग डायल 112 च्या माध्यमातून मदत करतो ते व्यक्ती मदतीबद्दल समाधानी आहेत हे पोलीसांनी बघितले पाहिजे असे सांगून देसाई म्हणाले, ज्यांच्यावर अन्याय झाला, जो संकटात सापडला अशा व्यक्तींना डायल 112 च्या माध्यमातून पोलीस मदत करतात. डायल 112 साठी काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतूक कमी आहे. यामाध्यमातून चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डायल 112 वर प्रतिसादाचा वेळ 15 मिनीटे 48 सेकंदाचा आहे. आता तो 10 मिनीटांवर आणण्याचे पोलीस अधिक्षकांचे नियोजन नक्कीच प्रशंसनीय आहे. पोलीस विभागात नवनवीन अशा प्रकारच्या कल्पना आणून ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीसांच्या ब्रिद वाक्यानुसार प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांने काम करावे. असे ते म्हणाले.
मीणा म्हणाले, डायल 112 या प्रतिसाद यंत्रणेबाबत लोकांना जास्त अपेक्षा आहे. ज्यांना या यंत्रणेची मदत मिळाली, त्यामधून लोकांचे समाधान झाले याबाबत त्यांचे अभिप्राय घेणे आवश्यक आहे. पोलीस त्वरीत प्रतिसाद देतात याबाबत लोकांची अपेक्षा दिसून आली पाहिजे. वाशिम पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 45 वाहने उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री देसाई यांचे मीणा यांनी आभार मानले.
सिंह यांनी डायल 112 बाबतीची माहिती यावेळी दिली. ज्या भागातून डायल 112 वर जास्त कॉल येतात. त्या भागातील पोलीस स्टेशनला अतिरिक्त वाहने देण्यात येतील. निर्भया वाहने जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. महिला संदर्भात येणाऱ्या कॉलची तात्काळ दखल घेण्यात येईल. निर्भया वाहनावर मोबाईल डाटा टर्मिनल लावण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.
वाशिम जिल्हा डायल 112 या महाराष्ट्र आपत्कालिन प्रतिसाद यंत्रणेत राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून श्री. सिंह म्हणाले, 16 सप्टेंबर 2021 रोजी वाशिम जिल्ह्यात डायल 112 क्रमांक कार्यान्वीत झाला. हा प्रकल्प राबवितांना पिडितांना कमीत कमी वेळेत मदत पोहोचविण्यामध्ये वाशिम जिल्हा हा राज्यातील सर्व जिल्हे आणि आयुक्तालयाचा विचार करता राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. वाशिम जिल्ह्यात प्रतिसादाची वेळ सर्वात कमी 15 मिनिटे 48 सेकंद इतकी आहे. डायल 112 वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्रतिसाद देण्यासाठी 21 दुचाकी आणि 24 चारचाकी वाहने कार्यरत आहे. 6 पोलीस अधिकारी, 262 प्रतिसाद कर्ता आणि 10 डिस्पॉचर असा प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग या कक्षात कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
डायल 112 वर 3029 कॉल मोबाईल डाटा टर्मिनलवर (एमडीटी) पाठविण्यात आल्याने सांगून सिंह म्हणाले, एमडीटीद्वारे कॉल पूर्ण करण्याचे वाशिम जिल्हयाचे प्रमाण 99.64 टक्के आहे. या प्रकल्पाची जिल्ह्यात सुरुवात झाली तेव्हा पिडितांना प्रतिसाद देण्याचा कालावधी 25 मिनिटे 10 सेकंदाचा होता. त्यामध्ये सुधारणा करुन तो मे 2022 मध्ये 10 मिनिटे 43 संकेदापर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिसादाची वेळ 58 टक्के कमी झाली आहे. डायल 112 वर प्राप्त होणाऱ्या तक्रारीपैकी सर्वात जास्त तक्रारी ह्या महिलांशी संबंधित गुन्हे-808, गुन्हे-678, चौकशी -511 आणि अपघात-270 अशा प्रकारच्या आहेत. सर्वात जास्त तक्रारी ह्या वाशिम शहर पोलीस स्टेशन-535, रिसोड पो.स्टे.-375, मालेगांव पो. स्टे-322 आणि मंगरुळपीर पोलीस स्टेशन-293 तक्रारी आहे. डायल 112 च्या प्रतिसादाची वेळ भविष्यात 10 मिनिटांपेक्षा कमी करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सिंह यांनी सागितले.
यावेळी डायल 112 कक्षाच्या सहायक पोलीस निरिक्षक मनिषा तायडे यांचेसह कक्षातील पोलीस कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. वाशिम जिल्हा डायल 112 मध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याबाबतचा आनंद यावेळी केक कापून साजरा केला. डायल 112 च्या कक्षातील कर्मचाऱ्यांनी यावेळी केक कापला. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांना जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी केक भरविला.
0 Response to "सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी कर्तव्याच्या भावनेतून पार पाडावी"
Post a Comment