भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
रिसोड: माजी खासदार तथा दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत प्राथमिक शाळेत जय पारितोषिक योजनेअंतर्गत बक्षीस वितरण करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि आर्य शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. नकुलदादा देशमुख यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून रिसोड तहसीलचे तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर, अमृताताई, प्राचार्य राजेश नंदकुले, शैलेश काटे, प्राचार्या मंजुषा देशमुख, छायाताई खके,मुख्याध्यापिका किरणताई दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध नवोपक्रम व स्पर्धांची माहिती तसेच जय पारितोषिक योजनेचे स्वरूप व संकल्पना सांगितली. यानंतर जय पारितोषिक योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना, बौद्धिक व मैदानी स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नकुलदादा देशमुख आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,"शालेय जीवनात मिळवलेले पुरस्कार व कौतुक विद्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात ध्येयप्राप्तीसाठी प्रेरणादायी ठरतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांच्या व प्रतिभेच्या विकासात शिक्षक व पालकांची मोलाची भूमिका असते. शालेय जीवनात शिक्षकांकडून यशाला गवसणी घालण्याची जिद्द आपल्या मनात निर्माण होते. शालेय,सहशालेय उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारमूल्ये रुजवणेही तेवढेच महत्वाचे असते."
"एक यशस्वी व्यक्ती म्हणून नावारूपास येण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत व अभ्यासूवृत्ती जोपासली पाहिजेत.समाजाच्या,देशाच्या प्रगतीसाठी विधायक कामे करायची आहेत हा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ध्येयपूर्ती करण्याकडे पूर्ण लक्ष द्यावे.तसेच पालकांनी सुद्धा मुलाचा कल पाहून त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे."असे प्रतिपादन तहसीलदार अजित शेलार यांनी केले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय वाघ यांनी केले तर मंगेश तहकीक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .सदर कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण"
Post a Comment