
जिल्हा परिषदेमध्ये सेवा हक्क दिन साजरा!
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषदेमध्ये सेवा हक्क दिन साजरा!
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीस २८ एप्रिल २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद कार्यालयातील स्व. वसंतराव नाईक सभागृहात 'सेवा हक्क दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विहित कालावधीत सेवा देण्याबाबत आपण अधिकारी कर्मचारी म्हणून कटिबद्ध असल्याबाबतची शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी प्रमोद बदरखे यांची उपस्थिती होती. राज्य शासनाने यावर्षी २८ एप्रिल हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्हास्तरावर तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबवले जात असून, नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व वेळेवर सेवा मिळाव्यात हा उद्देश अधोरेखित केला जात आहे. नागरिकांमध्ये सदर अधिनियमाबाबत, राज्य सेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल मार्फत आॅनलाईन उपलब्ध सेवा बाबत जनजागृसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रभारी उप मुख्य कार्यकारी बदरखे यांनी केले.
प्रत्येक नागरिकाला ठरावीक कालावधीत त्यांच्या हक्काच्या सेवा मिळाल्या पाहिजे, लोकसंपर्क, संवेदनशीलता आणि तत्परता ही लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे. आगामी काळात या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवा प्रतिज्ञा घेतली. त्यांनी शासनाच्या सेवा प्रामाणिकपणे, निष्ठेने, सौजन्याने आणि ठरलेल्या वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता व्यक्त केली. भ्रष्टाचारमुक्त आणि अडथळारहित सेवा देण्यासाठी कटिवद्ध राहण्याचा संकल्प केला. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्याची जनजागृतीसाठी सदर नियमाची माहिती पुस्तिका वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "जिल्हा परिषदेमध्ये सेवा हक्क दिन साजरा! "
Post a Comment