लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी प्रलंबित ऑनलाईन सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात
साप्ताहिक सागर आदित्य
लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी
प्रलंबित ऑनलाईन सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात
रामबाबू नरूकुल्ला
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सभा
वाशिम, : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे तात्काळ ऑनलाईन सेवा मिळण्यासाठी यंत्रणांनी काम करावे. असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोग अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.
आज २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा सभेत नरुकुला बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे,मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नरुकुल्ला म्हणाले, या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणांनी दक्ष राहून तपासणी अहवाल दरमहा नियमित जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा. आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. ज्या विभागाच्या योजनांचा संबंध नागरिकांशी येतो, त्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन सेवांचा लाभ मिळाला पाहिजे. ऑनलाइन सेवांबाबत नागरिकांना पूर्ण माहिती नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी विविध माध्यमातून लोकांना योजनांची माहिती देऊन ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्याबाबत कळवावे, असे ते म्हणाले.
चांगल्याप्रकारे ऑनलाईन सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निश्चितच सन्मान करण्यात येईल. असे सांगून नरुकुला म्हणाले, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. नागरिकांना चांगल्या सेवा देण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ज्या सेवा-सुविधा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत, त्या सेवा नागरिकांना वेळेत मिळाल्या पाहिजे यासाठी यंत्रणांनी प्रयत्नशील असावे. ज्या विभागाच्या सेवा सुविधा कमी आहेत त्या त्वरित ऑनलाइन करण्यात याव्यात. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
जिल्ह्यात १६ विभागाच्या सेवा ऑनलाईन आहे. जिल्ह्यातील १६ विभागाकडे ऑनलाइन सेवेसाठी २ लक्ष ५२३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ लक्ष ९८ हजार ८३० ऑनलाईन सेवेचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यात ५८८ आपले सरकार सेवा केंद्र असल्याची माहिती घुगे यांनी दिली.
सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0 Response to "लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी प्रलंबित ऑनलाईन सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात"
Post a Comment