
वादळी वाऱ्याचा इशारा! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता – प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
वादळी वाऱ्याचा इशारा! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता – प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन
जिल्ह्यात हवामान खात्याचा तात्काळ इशारा
नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सुचनांचे पालन करावे
वाशिम, जिल्ह्याच्या काही ठिकाणी विजेसह वादळी वाऱ्यासह (वेग ४०-५० किमी/तास) हलक्या पावसाची शक्यता आहे.
नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार संभाव्य वादळी वाऱ्यांपासून नागरिकांचे संरक्षण आणि नुकसान टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्तरापासून तालुकास्तरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार असून नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न राहतील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे
हवामान खात्याने दिलेला इशारा गांभीर्याने घेत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत केली जाईल. सोशल मीडियावरून चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका व अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत
0 Response to "वादळी वाऱ्याचा इशारा! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता – प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन"
Post a Comment