
स्वानंद योग लेव्हल आध्यात्मिक शिबीराचा ९ शाळांमधुन चार हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ जीवनविद्या मिशनचा पुढाकार : भव्य ग्रंथ दिंडीने वत्सगुुल्म नगरी दुमदुमली
साप्ताहिक सागर आदित्य
स्वानंद योग लेव्हल आध्यात्मिक शिबीराचा ९ शाळांमधुन चार हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
जीवनविद्या मिशनचा पुढाकार : भव्य ग्रंथ दिंडीने वत्सगुुल्म नगरी दुमदुमली
वाशिम - तन मन धन या तीन शब्दाचे महत्व समजून त्याव्दारे जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग विद्यार्थ्यांनी समजून घेण्यासाठी जीवनविद्या मिशन कांजूरमार्ग ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने शनिवार, १३ जानेवारी रोजी स्थानिक स्वागत लॉनमध्ये पार पडलेल्या तीन तासाच्या तन, मन व धन आधारित स्वानंद योग लेव्हल ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ या शिबिराला व फाऊंडेशन कोर्सला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. ९ शाळांमधून ४ हजार विद्यार्थ्यांनी सप्ताहात झालेल्या शिबीरात तज्ञांच्या अमुल्य मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
प्रारंभी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीचे नागरिकांनी ठिकठिकाणी उस्फूर्त स्वागत केले. या दिंडीव्दारे सद्गुरु वामनराव पै ग्रंथ रूपाने घराघरात विराजमान झाले. त्यानंतर सप्ताहामध्ये शहरातील ९ शाळांमधून जीवनविद्या मिशनने ४००० विद्यार्थ्यांना शिल्पकार या शिबिरातून उत्तम मार्गदर्शन केले. त्यात प्रथम तन यामध्ये मानवी शरीराचे महत्व, शरीर आहे तर सर्व आहे, उत्तम आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली हे सर्व समजावून सांगितले. दुसर्या भागात मन म्हणजे काय, मनाची विलक्षण शक्ती, मनाचे प्रकार, जीवन घडविणारे किंवा बिघडविनारे मनच, राम पण मन रावण पण मन, अशा या मनाला हाताळायचे कसे आणि आपले संकल्प कसे पूर्ण करून घ्यायचे हे अतिशय सखोलपणे सांगण्यात आले तर तिसर्या भागात धन कोणते, किती प्रकारचे आणि कोणत्या मार्गाने मिळवायचे, कोणत्या गोष्टीसाठी खर्च करायचे, पैसा हा धनलक्ष्मी आणि कडकलक्ष्मी सुद्धा आहे हे चित्र फितीद्वारे सदगुरु प्रल्हाद वामनराव पै यांनी समजावून सांगितले. आजच्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर प्रकाश टाकून त्यावर उपाययोजना सांगितल्या. मोबाईल, संगती, अभ्यास इत्यादी विषयांवर सुलभ रितीने मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ सुनिल बहाटे यांनी आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणीतुन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तसेच विविध कला व पैलूंवर भर देण्यात यावा हे सांगितले. जीवन जगण्याची कला तसेच एक चांगला नागरीक होण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला विविध क्षेत्रातील जवळपास २०० मान्यवरांची उपस्थिती होती. मार्गदर्शनाने प्रभावित होवून अनेकांनी जीवनविद्या मिशनच्या कर्जत ज्ञानपीठामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली.
शिबीरात एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, नारायणा किड्स, गुरुकुल स्कूल, राधाबाई कन्या शाळा, हॅप्पी फेसेस स्कूल तसेच वर्ल्ड स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी जीवनविद्या मिशनचे विश्वस्त दशरथ शिरसाट, सचिव सौ. अनुराधा पांचाळ यांच्या नेतृत्वात २५ नामधारकांनी परिश्रम घेतले. तसेच अनिल घुनागे, अॅड. सुरेश टेकाळे, सौ. वृषाली टेकाळे, निखिल कांत, सुरेशलोध, गजानन महाराज मंदिराचे राऊत, अविनाश मारशेटवार, सुरुशे गुरुजी, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, जीवनविद्या मिशन मलकापूर केंद्राचे नामधारक व सौ. टेकाडे, भराटे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला विवेक पाटणी, अरुणराव सरनाईक, एलआयसीचे व्यस्थापक ठाकूर, आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक, मुख्याध्यापिका भावना सुतवणे, आरटीओ निरिक्षक अधिकारी पल्लेवार, इंगळे, डॉ. डाळे यांच्यासह पोलीस अधिकारी, शिक्षक व महिला वर्ग बहूसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "स्वानंद योग लेव्हल आध्यात्मिक शिबीराचा ९ शाळांमधुन चार हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ जीवनविद्या मिशनचा पुढाकार : भव्य ग्रंथ दिंडीने वत्सगुुल्म नगरी दुमदुमली"
Post a Comment