भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा शहिद जवानांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदारांचा सन्मान
साप्ताहिक सागर आदित्य
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा
शहिद जवानांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदारांचा सन्मान
वाशिम, दि. १५ ऑगस्ट जिल्हयातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासोबत मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणा सुक्ष्म नियोजनातून काम करत आहेत. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाला प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
आज १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्याहस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना त्या बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे तसेच वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्यासह विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती बुवनेश्वरी शुभेच्छा संदेश देताना म्हणाल्या, जिल्हयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन’ योजनेकरीता १ लाख ८५ हजार पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून अजूनही नविन अर्ज येत आहे. पात्र महिला लाभार्थीना दरमहा १५०० रुपये लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरिप व रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हयामध्ये १७९ कोटी रुपये पेक्षा जास्त वितरीत करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत आतापर्यंत अपघातग्रस्त कुटूंबातील ६१ वारसांना १ कोटी १० लाख रुपये वितरीत करण्यात आले आहे.
कृषि यांत्रिकीकरण योजनेंअतर्गत या वर्षामध्ये २११ लाभार्थांना १ कोटी ७३ लक्ष रुपयेपेक्षा जास्त अनुदान देण्यात आले आहे. तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १७० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.
रब्बी हंगामामध्ये सेंद्रीय पध्दतीने ८९८ हेक्टरवर चिया या नाविण्य पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर चिया पिकाचे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा ४ हजार ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल अधिकचा दर मिळाला आहे.
१ लाख एकर क्षेत्रावर कार्बन क्रेडिट ही संकल्पना नव्याने राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना प्रतीवर्ष ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
पैनगंगा नदीवर मध्यम प्रकल्प व लघु प्रकल्पांची सिंचन क्षमता २८ हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन सिंचीत होणार आहे.
पुढे जिल्हाधिकारी म्हणाल्या,वाशिम जिल्हा हा कमी पर्जन्यमानाचा जिल्हा आहे. शेती सिंचनासाठी मोठे प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांना विहीरीच्या पाण्यावरच अवलंबून राहावा लागतो. या दृष्टीकोणातून जिल्हयात मनरेगाअंतर्गत १२ हजार पेक्षा जास्त विहीरींची कामे होणार आहे. यामुळे सिंचनक्षेत्रात नक्कीच वाढ होईल असा मला विश्वास आहे.
जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्यामध्ये वाशिम जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हयाची कुपोषणमुक्तीकडे प्रभावी वाटचाल सुरु असून नुकतेच राज्य शासनाने वाशिम जिल्हा हा कुपोषणमुक्तीमध्ये राज्यात उत्कृष्ट असल्याचे जाहिर केले आहे.
जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी, यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासोबतच जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम आपण सर्व मिळून काम करूया.असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते शहिद सैनिकांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या जोडीदार यांचा त्यांनी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये वीर पत्नी श्रीमती शांताबाई यशवंत सरकटे व श्रीमती पार्वताबाई दगडू लहाने, वीरमाता मंदाबाई गोरे ,वीरपीता तान्हाजी गोरे,स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदार श्रीमती साधना जनार्धन खेडकर यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी त्यांचे अभिनंदन केले. परेड कमांडर मांगीगाल पवार यांच्या नेतृत्वात सलामी पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी माजी सैनिक, स्काऊट गाईड, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, पत्रकार, विविध विभागांचे कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक मोहन शिरसाठ यांनी मानले.
0 Response to "भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा शहिद जवानांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदारांचा सन्मान"
Post a Comment