
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनातील दिरंगाई भोवली: ८ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश
साप्ताहिक सागर आदित्य
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनातील दिरंगाई भोवली: ८ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश
जिल्हा परिषदेत तब्ब्ल १०२ ग्रामसेवकांची सुनावणी!
वाशिम, दि. 10 ऑक्टोबर
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांत कुचराई करणाऱ्या १०२ ग्रामसेवकांची सुनावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसुमना पंत यांनी १० ऑक्टोबर रोजी घेतली. यावेळी दिरंगाई करणाऱ्या ८ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना सीईओंनी दिले.
स्वच्छ भारत मिशन आणि जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी सर्व तालुक्याचे गट विकास अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली १ सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती. यावेळी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची १५ लाखांच्या आतील कामे सुरू करण्यास अनेक ग्रामपंचायतींची उदासिनता समोर आली होती. तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाच्या कामातही अनेक गावामध्ये विलंब होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी स्वच्छ भारत मिशनच्या कामासह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात विलंब होत असल्याबद्दल सीईओ वसुमना पंत यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी वरील कामांत कुचराई करणाऱ्या ग्रामसेवकांची सुनावणी लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, १० ऑक्टोबर रोजी सीईओंच्या कक्षात तब्बल १०२ ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यायन वारंवार सूचना देऊनही कामकाजात सुधारणा न करणाऱ्या तसेच दिरंगाई करणाऱ्या ८ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश सीईओंनी दिले. जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.
------------
कामात दिरंगाई खपवून घेणार नाही : पंत
स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामिन आवास योजना या दोन योजनेला ‘टॉप प्रायोरिटी’ द्यावी, अशा सूचना देतानाच कोणत्याही शासकीय कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिला.
-----------
गैरहजर ग्रामसेवकांना शिस्तभंगाची नोटीस:
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश देवूनही मंगळवारच्या सुनावणीला जिल्ह्यातील जवळपास १९ ग्रामसेवक गैरहजर राहिले. याची गंभीर दखल सीईओंनी घेतली असून, गैरहजर राहणाऱ्या १९ ग्रामसेवकांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
------------
२५ तारखेला दुसरी सुनावणी:
आज बोलावलेल्या ग्रामसेवकांची दुसरी सुनावणी २५ आक्टोबर ठेवण्याची निर्देश सीईओ पंत यांनी दिले. त्यामध्ये आज गैरहजर ग्रामसेवकांसह कामात प्रगती नसणार्यास ग्रामसेवकांवर कठोर कारवाईचे संकेत सीईओंनी दिले आहेत. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे यांच्यासह तालुक्याचे शाखा अभियंता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन सल्लागार तसेच बीआरसी व सीआरसी यांची यांची उपस्थिती होती.
0 Response to "सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनातील दिरंगाई भोवली: ८ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश"
Post a Comment