
कर्तबगार अधिकाऱ्यांचा होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार!
साप्ताहिक सागर आदित्य
कर्तबगार अधिकाऱ्यांचा होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार!
शहर विकासात मोलाची भूमिका : शहरवासींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वाशिम - वाशिम शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्तबगार अधिकाऱ्यांचा गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता अकोला नाका येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सत्कार सोहळ्याला शहरवासी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक आपचे माजी जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले व मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी केले आहे.
वाशिम तसा अकांक्षीत जिल्ह्यांच्या पंक्तीमधील जिल्हा होय. मात्र, गेल्या काही वर्षांत वाशिम शहराचा विकास फार झपाट्याने होत आहे. शहरातील या विकासात्मक कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच नगर परिषद प्रशासनातील कर्तबगार, कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, शहर विकासाठी जिवाचे रान करणारे अधिकारी व अभियंते यांची फार मोलाची भूमिका आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेपुढे नतमस्तक होऊन, शहरवासींकडून कृतज्ञतेपोटी हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता अकोला नाका येथे हा सोहळा पार पडणार आहे. सत्कारमूर्तींमध्ये प्रामुख्याने सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, सा. बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गिनमिने, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलेश गायकवाड, नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता अशोक अग्रवाल, न. प. स्वच्छता विभागाचे अभियंता जितू बढेल, न. प. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता गजानन हिरेमठ, न. प. विद्युत अभियंता प्रकाश गणेशपुरे यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक आपचे माजी जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले, मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी केले आहे.
.......
वाशिम शहर विकासासाठी जिवाचे रान करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलून गेला. त्यांना ज्या सुख-सोयी मिळत आहेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी मॅडम यांच्या हस्ते या दिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त नागरिक, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्यासंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.
-राम पाटील डोरले, माजी जिल्हाध्यक्ष आप
-राजू पाटील किडसे, जिल्हाध्यक्ष मनसे
0 Response to "कर्तबगार अधिकाऱ्यांचा होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार!"
Post a Comment