
जागतिक हात धुवा दिनानिमित्त गावस्तरावर विविध उपक्रम राबवा: सीईओ वसुमना पंत
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक हात धुवा दिनानिमित्त गावस्तरावर विविध उपक्रम राबवा: सीईओ वसुमना पंत
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षीही वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवसाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्वाच्या वेळा म्हणजे स्वयंपाक करण्यापुर्वी, स्वयंपाक झाल्यावर, शौचविधीहून आल्यावर, बाळाची शी धुतल्यानंतर, जेवणापुर्वी व जेवणानंतर इत्यादी बाबीसंदर्भात जनजागृती घडवून गावस्तरावर मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. दिनांक १५ ऑक्टोबर रोजी गाव, शाळा व अंगणवाडीतून हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. विशेष: शालेय स्तरावर करून मुलांना हात धुण्याच्या पध्दती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. तसेच जागतिक हात धुवा दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला व पोस्टर अशा विविध स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात येणार आहे. तरी जागतिक हात धुवा दिवस ग्रामपंचायतीसह सर्व पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बाल विकास कार्यालयात साजरा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी केले आहे. जागतिक हात धुवा दिन यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने व इतर सल्लागार- अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
उत्कृष्ट काम केलेल्या ३ जि.प. शाळांचा गौरव: सीईओ पंत
दरम्यान जागतिक हात धुवा या अभियानात नाविन्यपुर्ण व उत्कृष्ट उपक्रम राबविलेल्या जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषद शाळांचा गौरव जिल्हा स्तरावर करणार असल्याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केली.
0 Response to "जागतिक हात धुवा दिनानिमित्त गावस्तरावर विविध उपक्रम राबवा: सीईओ वसुमना पंत"
Post a Comment