नुकसानीचे पंचनामे तातडीने करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी
३५५ .८० हेक्टर पिकांचे नुकसान
वाशिम, दि. ३ सप्टेंबर : जिल्ह्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी दि. ३ सप्टेंबर रोजी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत प्रत्यक्ष विविध ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी यंत्रणांना सूचना केल्या.
जिल्ह्यात दि.१ व २ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. काही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याची नोंद झाली. तसेच १ पशूधन दगावले आहे.
जिल्ह्यात पाऊस व पुरस्थितीमुळे घरांची पडझड होऊन नुकसान झाले असल्याचा प्राथमिक सर्वे आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, कापुस, तुरीचे देखील नुकसान झाले आहे. ३५५.८० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले आहे. ५२ हेक्टरवरील जमिनीचे क्षेत्र खरडुन गेले आहे.
जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना करत घरांची पडझड झालेल्या बाधितांना आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. पुरस्थितीमुळे ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हयात पावसाची संततधार सुरू असल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा अंदाज घेऊनच लोकांनी कामकाजाचे नियोजन करावे.नदी-नाल्यांना पुर आल्यास त्याठिकाणी नागरीक,महिला व लहान मुलांनी पुलावरुन रस्ता ओलांडू नये. नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे.कोणीही मासेमारी करण्यास तलाव,धरण किंवा नदयामध्ये जाऊ नये.पुराच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. एखादी व्यक्ती पुरात अडकली असल्यास बरेच जण फक्त व्हिडिओ काढण्यात व्यस्त असतात. समयसूचकता ठेवून कोणी जर पुरात वाहून जात असल्यास त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केले. पुलावरुन पाणी वाहत असतांना पूल ओलांडू नये.असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,मानोरा तहसीलदार संतोष यावलीकर, मंगरूळपीर तहसीलदार शीतल बंडगर उपस्थित होते.
0 Response to "नुकसानीचे पंचनामे तातडीने करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "
Post a Comment