
वाकद गावात पाणी पुरवठा सुरु; उपोषण मागे घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
वाकद गावात पाणी पुरवठा सुरु; उपोषण मागे घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी वाकद ता रिसोड येथील ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विहीरीवरुन पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. याबाबत सोमवार दि. 17 रोजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.
जल जिवन मिशन अंतर्गत रिसोड तालुक्यातील वाकद या गावात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असुन सदर काम अद्यापही पुर्ण न झाल्यामुळे गावामध्ये मागील दोन ते अडीच वर्षापासून नळाला एकही थेंब पाणी न आल्याने ग्रामस्थांच्या वतीने कंत्राटदार व प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त करीत उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. ग्रामस्थांसह ग्राम पंचायतीचे सरपंच हे मागील ९ दिवसांपासुन जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषणास बसले आहेत. याबाबत प्रशासनाने कंत्राटदार यांचे विरोधात कार्यवाही करण्या बाबतचे निवेदन व ग्रा.पं.चा ठराव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयास सादर केले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी वाकद ता रिसोड येथील ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्यांची मुख्य मागणी एकलासपूर तलावामधून गावाकरीता पाणी पुरवठा सुरू करणे ही आहे. उपोषणकर्त्यांनी आवक विहिर, जोड नलिका, जॅक वेल ही कामे पुर्ण होईपर्यंत धरणावरुन तरंगत्या पंपाने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
याबाबत दि. १० फेब्रुवारी रोजी उपविभागीय अभियंता यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मुख्य मागणी बाबतच्या अडचणीची माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे यांनी दि.११ व १७ फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली व उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. धरणावरुन तरंगत्या पंपाने पाणी पुरवठा करने ही बाब मंजुर अंदाज पत्रकाबाहेरील असुन यासाठी तेथे विद्युत जोडणी करणे देखील आवश्यक आहे. तसेच सद्यस्थितीत जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत माहे ऑक्टोबर-२०२४ पासुन निधी उपलब्ध नसल्याने सदरील काम पूर्ण करण्यास आणखी वेळ लागू शकतो. ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विहीरीवरुन जल जीवन मिशन अंतर्गत च्या वितरणव्यवस्थेमधून प्रशासनामार्फत पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत च्या वितरणव्यवस्थेमध्ये काही ठिकाणी लीकेज आढळून आल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर सपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी उपोषण मागे घेवुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे यांनी उपोषणकर्त्यांना प्रत्यक्ष भेटुन व लेखी पत्र देऊन केले आहे.
0 Response to "वाकद गावात पाणी पुरवठा सुरु; उपोषण मागे घेण्याचे प्रशासनाचे आवाहन"
Post a Comment