
श्री. पांडुरंग विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
श्री. पांडुरंग विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा
पिंपळा:-येथील श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पिंपळा येथे दि. ०५ सप्टेंबर २०२२ रोजी भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन व स्वयंशासन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, व कर्मचारी वृंद झाले होते. सकाळच्या सत्रात त्यांनी विविध वर्गाचे विषयवार वेळापत्रक बनवून वर्गाच्या तासिका अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घेतल्या व एक दिवस शिक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.वर्गात शिकविण्याची पद्धत, विद्यार्थ्यावर योग्य ते नियंत्रण तसेच शाळेतील सर्व व्यवस्थापन, दिवसभराचे कामकाज त्यांनी अत्यंत योग्य नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले.
दुपारच्या सत्रात भारतरत्न, देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी मुख्याध्यापक शिवम राऊत व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी लिपिक विनायक लांडकर ,कार्तिक हांबरे, मंगेश शिंदे व ज्ञानेश्वर कु-हे व सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या निमित्ताने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर आपल्या भाषणातून व गीतातून विचार प्रगट केले सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.ई. गवळी सर यांनी शिक्षकांवरती 'मित्र' या नावाची कविता सादर करून मुलांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षदा कव्हर तर आभार प्रदर्शन कु. ज्ञानेश्वरी गोटे हिने केले. यावेळी विद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच वर्ग ५ वी ते १२ वी चे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता `दया कर दान भक्ती का... ʼया प्रार्थनेने करण्यात आली व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
0 Response to "श्री. पांडुरंग विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा"
Post a Comment