पाझर तलावातुन अवैध पाणी उपसा अडोळी येथुन 8 मोटारपंप जप्त. जि. प. च्या लघु सिंचन विभागाची कारवाई
साप्ताहिक सागर आदित्य
पाझर तलावातुन अवैध पाणी उपसा
अडोळी येथुन 8 मोटारपंप जप्त.
जि. प. च्या लघु सिंचन विभागाची कारवाई
मौजे आडोळी (ता. वाशिम) येथील पाझर तलावातून अवैध पाणी उपसा करणाऱ्या ८ मोटार पंप जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या वतीने (दि. 31 रोजी) जप्त करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विश्वास घुगे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली.
ग्रामीण भागात पाझर तलावाचे अत्यंत महत्त्व आहे. पाझर तलावामुळे परिसरातील भूजल पातळीमध्ये वाढ होते. त्यामुळे गावठाण नजीक पिण्याच्या पाण्याचे सोर्स मजबूत राहतात तसेच उन्हाळ्यामध्ये जनावरांनाही पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाझर तलाव हा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. मात्र अशा पाझर तलावातून काही निवडक सधन शेतकरी अवैधरित्या पाणी उपसा करीत असल्याच्या घटना सर्रास घडतात. वाशिम जिल्हा परिषदेने अशा प्रकारावर आळा घालण्याचे निर्देश यापूर्वी दिले होते. जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी स्वत: अवैध उपसा करणाऱ्या मोटर पंपावर धाड टाकून साहित्याची जप्ती केली होती.
----------------------------------------
“अडोळी येथील पाझर तलावातनु पाण्याची चोरी होत असल्याची घटना गंभीर आहे. यामुळे गावावर पाणी टंचाईचे संकट ओढवु शकते. या तलावातुन 8 मोटारपंप जप्त करण्यात आल्या असून या कारवाई वरून इतरांनी बोध घ्यावा. यापुढे असा प्रकार आढळल्यास केवळ जप्तीवर न थांबता संबंधितावर पोलीस केस दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.”
-वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी.
---------------------------------------------
सोमवारी वाशिम तालुक्यातील अडोळी या गावातील पाझर तलावात असा प्रकार घडत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली तेव्हा जि प च्या लघु सिंचन विभागाने तात्काळ कार्यवाहीचा पवित्रा घेतला. अडोळी येथे केलेल्या मोटार जप्तीच्या कारवाई मध्ये लघु सिंचन विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विश्वास घुगे, जल संधारण अधिकारी आर एन इंगळे, एन एन नन्नवरे, मंडळ जल संधारण अधिकारी आर एच उपाध्ये, सरपंच सविता इढोळे, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद पडघान, उपसरपंच भगवान ईढोळे,लाईनमन विनोद भोयर आदिंचा समावेश होता. जप्त करण्यात आलेले आठही मोटारपंप ग्राम पंचायत कार्यालयात आणुन ठेवण्यात आले.
या कारवाईनंतर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी सरकारी विहिर अथवा सरकारी तलावांमधून अवैध पाणी उपसा करण्यात येत असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सीईओ वैभव वाघमारे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
------------------------------------------
राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to " पाझर तलावातुन अवैध पाणी उपसा अडोळी येथुन 8 मोटारपंप जप्त. जि. प. च्या लघु सिंचन विभागाची कारवाई"
Post a Comment