ओबीसी वसतिगृहातील कर्मचारी सहा महिन्यांपासून वेतनाविना
साप्ताहिक सागर आदित्य
ओबीसी वसतिगृहातील कर्मचारी सहा महिन्यांपासून वेतनाविना
वाशिम : ओबीसी वसतिगृहात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना गत सहा महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी या कर्मचार्यांकडुन केली जात आहे.
जिल्हानिहाय वसतिगृह कार्यान्वित करण्याचा २८ फेब्रुवारी २०२३ ला निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यात मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहाचा कार्यभार पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांची देखरेख व सुरक्षेसाठी गृहपाल, लिपिक, शिपाई, सफाई कामगार व सुरक्षा रक्षक अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती मार्चपासून तर काहींची ऑगस्ट महिन्यात करण्यात आली. हे सर्व कर्मचारी इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. पण कामावर नियुक्त असलेल्या व सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत वेतन देण्यात आले नाही. या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणीला द्यायला सरकारकडे पैसे आहे, पण जे प्रत्यक्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाचे अंतर्गत ही वसतिगृह सुरू आहेत. पण या वसतिगृहांसाठी सरकारने निधीच उपलब्ध करून दिला नसल्याचे सांगितले जात आहे. निधीअभावी वसतिगृहात मेस नाही, योग्य भौतिक सोयी सुविधांचा अभाव आहे. त्याचप्रमाणे निधीअभावी वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन नाही.
चौकट:
राज्यातील वसतिगृह भाड्याच्या इमारतीत
राज्यातील इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी एक व मुलींसाठी एक याप्रमाणे ३६ जिल्ह्याच्या ठिकाणी ७२ शासकीय वसतिगृह शासनाने स्वतः इमारत भाड्याने घेतली. वाशिम मध्ये सुध्दा मुला- मुलींसाठी दोन इमारतीत भाड्यानै वसतीगृह घेण्यात आली आहेत.
0 Response to "ओबीसी वसतिगृहातील कर्मचारी सहा महिन्यांपासून वेतनाविना"
Post a Comment