माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण उत्साहात लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साप्ताहिक सागर आदित्य
महिलांच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे
माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण उत्साहात
लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम,दि.१७ ऑगस्ट (जिमाका) महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन विविध योजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझी लाडकी बहिण ही योजना आहे. वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. जिल्ह्यातील यंत्रणाचं काम पाहता हा ठपका लवकरच पुसल्या जाणार आहे. प्रत्येक यंत्रणा चांगले काम करत आहे. कुपोषण निर्मूलनात जिल्हा अव्वल आहे. माझी लाडकी बहिण योजना पुढे नेण्यासाठी शासन खंबीरपणे उभे आहे.महिलांच्या सर्वांगीण बळकटीकरणासाठी शासनासोबतच मी पण लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभाच्या अनुषंगाने शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात थेट प्रक्षेपणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.ठाकरे बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी निवृत्ती जटाळे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे, परिविक्षाधीन अधिकारी गजानन पडघान आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, या योजनेतून मिळणाऱ्या पैशातून आरोग्य,शिक्षण या गोष्टींसाठी उपयोग व्हावा. सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम केले.त्यामुळे सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
श्री.वाघमारे म्हणाले, महिला व बाल विकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’मध्ये २१ ते ६५ या वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये इतकी रक्कम आधारलिंक असलेल्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे. प्रत्येक यंत्रणेने चांगले काम केल्यामुळे जिल्हाचा राज्यात तिसरा क्रमांक लागला.
प्रास्ताविकात श्री.जोल्हे म्हणाले, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत २ लक्ष ५१ हजार लाभार्थी महिलांचे अर्ज सादर शासनस्तरावर अर्ज मंजूर झाले आहेत.१४ ऑगस्ट पासून जिल्ह्यातील महिलांना ह्या योजनेचा मोबदला मिळायला सुरू झाला. या योजनेचा पहिला पूर्ण झाला आहे. दूसरा टप्पा सुध्दा लवकरच पूर्ण होणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे व पर्यवेक्षक अविनाश सोनुने यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना राखी बांधल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.आभार श्रीमती भस्मे यांनी मानले.कार्यक्रमाला लाभार्थी महिला, अंगणवाडी सेविका, महिला व बालविकास यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचे थेट प्रक्षेपण उत्साहात लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद"
Post a Comment