-->

जि. प. सायकल ग्रुपने दिले हरणाला जीवदान

जि. प. सायकल ग्रुपने दिले हरणाला जीवदान



साप्ताहिक सागर आदित्य 

जि. प. सायकल ग्रुपने दिले हरणाला जीवदान


जिल्हा परिषद वाशिम च्या सायकल ग्रुप चे काही सदस्य आणि मॉर्निंग वॉक करणारे पत्रकार यांनी आज (दि. 18) कुत्र्याच्या तावडीतून सोडवून हरणाला जीवदान दिले.

जखमी हरणावर प्रथमोपचार करून वन विभागाच्या हवाली करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषदच्या सायकलींग ग्रुपचे रामानंद ढंगारे, सतिश लहामगे आणि राम श्रृंगारे हे सदस्य सायकलिंग करून परत येत असताना सकाळी पावणे आठ ते आठच्या दरम्यान त्यांना काटा रोडवरील शेतामध्ये एका हरणाच्या पाठीमागे कुत्रे धावत असतानाचे दृष्य दिसले. पावसामुळे शेतातील जमीन ओली झाल्यामुळे हरणाचे पाय फसल्याने हरीण खाली पडले आणि कुत्र्यांनी त्यावर झडप मारली. सायकलिंग ग्रुपच्या सदस्यांनी धावत जाऊन त्या हिंस्र कुत्र्यांना हुसकावुन लावले. मात्र तोपर्यंत कुत्र्यांनी नेमके नरडी आणि मानेवर चावा घेऊन जखमी केल्याने  हरिण शेतात आडवे पडले होते.  जखमी अवस्थेतील हरीण आपली सर्व शक्ती पनाला लावुन  कसेबसे उठले आणि रोडच्या दिशेने पळाले.तोपर्यंत आजुबाजुच्या शेतातील बरेच कुत्रे जमा झाले होते.  पळून जाणार्‍या हरणाला  पुन्हा चारी बाजूनी कुत्र्यांनी वेढले होते. तेव्हा पत्रकार बाळू देशमुख यांनी हरणाला पकडले आणि त्याला अभय दिले. शेजारच्या गोठ्यातुन हळद मागवुन त्यांच्या जखमेवर लावली. यावेळी मॉर्निंग वाॅक करणारे प्रज्वल बहादुरे यांनीही या कामी सहकार्य केले. सायकलिंग ग्रुपचे सदस्य राम श्रृंगारे यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. डॉ. केंद्रे यांनी तात्काळ पशुधन विकास अधिकारी डॉ. शुभम ठाकरे यांना फोन करून घटनेचे गांभीर्य सांगितले. डॉक्टर ठाकरे यांच्या निर्देशावरून काटा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील संजय बाजड व शिपाई हे अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी हजर झाले‌. त्यांनी हरणाच्या जखमांवर प्रथमोपचार करून इंजेक्शनही दिले. विशेष म्हणजे जखमी झालेले ( मादि) हरिण  गाभण असल्याची माहिती  बाजड यांनी दिली. वन अधिकारी यांच्या सल्ल्याने भेदरलेल्या हरणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली. तसेच रुमालाने त्याचे पाय बांधुन नंतर या जखमी हरणाला रस्त्यालगतच्या पाटणी यांच्या शेतातील गोठ्यामध्ये सुरक्षित ठेवले. पत्रकार बाळु देशमुख यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या घटनेबाबत माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी यांनी गाडी पाठवून गोठ्यात ठेवलेले जखमी हरीण ताब्यात घेतले.

0 Response to "जि. प. सायकल ग्रुपने दिले हरणाला जीवदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article