
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी पोर्टलवर अर्ज करा
साप्ताहिक सागर आदित्य
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी पोर्टलवर अर्ज करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. योग्य मशागत पध्दतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न दिल्याने राज्यात बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे.
नवीन लागवडीप्रमाणे जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याची फळपिकांची एकुण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची बाब आहे.
सन 2023-24 मध्ये राज्यात जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्पित खर्च 40 हजार रुपये प्रति हेक्टर ग्राह्य धरून 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कमीत कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देण्यात येईल.
पुनरूज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय पुढीलप्रमाणे आहे. आंबा - फळपिकाचे वय कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त वय 50 वर्ष. चिक्कु - फळपिकाचे वय कमीत कमी 25 वर्ष, जास्तीत जास्त 50 वर्ष. संत्रा - फळपिकाचे वय कमीत कमी 10 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष व मोसंबी- फळपिकाचे वय कमीत कमी 8 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिक्कू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.
0 Response to "एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी पोर्टलवर अर्ज करा"
Post a Comment