
अन्न व औषध प्रशासनाची सणासुदीच्या काळात विशेष तपासणी मोहीम घेतलेल्या ३७ नमुन्यांचे होणार विश्लेषण
साप्ताहिक सागर आदित्य
अन्न व औषध प्रशासनाची सणासुदीच्या काळात विशेष तपासणी मोहीम
घेतलेल्या ३७ नमुन्यांचे होणार विश्लेषण
वाशिम राज्यात काही जिल्हयामध्ये भगरमुळे झालेल्या अन्नविषबाधेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, वाशिम कार्यालयातर्फे मालेगाव तालुक्यात विविध दुकानांची तपासणी करून भगरचे दोन नमुने विश्लेषणास घेण्यात आले.तसेच सणासुदीच्या काळात जिल्हयात खाद्यतेलाचे ९ नमुने,तुपाचे ४ नमुने, दुधाचे ८ नमुने, दहीचे ३ नमुने, मिठाईचे ३ व इतर अन्नपदार्थांचे ८ नमुने असे एकूण ३७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे. मिठाईच्या दुकानात मिठाईच्या पदार्थांवर बेस्ट बिफोरचा उल्लेख न करणा-या एकुण ९ आस्थापनांवर कारवाई करत एकुण रु ३३,५००/- दंड ठोठावण्यात आला. कमी दर्जाचे किंवा असुरक्षित अन्न पदार्थ विक्री केल्यास संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) सागर तेरकर यांनी दिली.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सर्व अन्न व्यवसायिकांना सुचित करण्यात येते की,सणासुदीच्या काळात कुठल्याही प्रकारचे भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थाची विक्री करू नये. मिठाईचे पदार्थ तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचा खवा वापरावा.हे पदार्थ तयार करतांना वैयक्तिक स्वच्छता राखली पाहिजे. डिस्प्लेबर ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर उत्पादन तिथी व बेस्ट बिफोर तिथी नमुद असलेले स्टीकर लावावेत. नमकीन व इतर पदार्थ तळण्यासाठी चांगल्या दर्जाच्या खाद्यतेलाचा वापर करावा.
नमकीन व तत्सम पदार्थ तळण्यासाठी तेलाचा फक्त दोनदा वापर करावा.त्यानंतर खाद्यतेल तळण्यासाठी पुनःवापर करू नये, तसेच सणासुदीच्या काळात चांगल्या प्रतीचे खाद्यतेल, मैदा,रवा तसेच दुध/दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी.असे आवाहन तेरकर यांनी केले आहे.
0 Response to "अन्न व औषध प्रशासनाची सणासुदीच्या काळात विशेष तपासणी मोहीम घेतलेल्या ३७ नमुन्यांचे होणार विश्लेषण"
Post a Comment