
नंदीपेठ येथे मोफत आरोग्य शिबीराचा १७४ नागरीकांनी घेतला लाभ राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
नंदीपेठ येथे मोफत आरोग्य शिबीराचा १७४ नागरीकांनी घेतला लाभ
राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम
मोरया ब्लड डोनरग्रुप व नंदीपेठ मित्रमंडळाचा पुढाकार
वाशिम - निष्काम कर्मयोगी, राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक नंदीपेठ येथे मोरया बहूउद्देशिय संस्था व्दारा संचालीत मोरया ब्लड डोनर ग्रुप व नंदीपेठ मित्रमंडळाच्या पुढाकारातून तसेच ह्दयरोगतज्ञ डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनात बुधवार, २१ डिसेंबर रोजी आयोजित मोफत मधुमेह, रक्तदाब व ह्दयरोग तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीराचा १७४ नागरीकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाला डॉ. सिध्दार्थ देवळे, डॉ. पुरुषोत्तम नरवाडे, डॉ. साजीदखान, श्री बनसोड यांची उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेचे पुजन, हारार्पण व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोरया ब्लड डोनर ग्रुप व नंदीपेठ मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष महेश धोंगडे यांनी डॉ. सिध्दार्थ देवळे व उपस्थित डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी डॉ. सिध्दार्थ देवळे व सहभागी डॉक्टरांनी शिबीरात सहभागी नागरीकांची मधुमेह, रक्तदाब व ह्दयरोग तपासणी केली. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनातून बोलतांना डॉ. देवळे म्हणाले, की आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. कामाची बैठकी पध्दत, मोबाईलचा अतिरेक, व्यस्त जीवनशैली, योग्य आहार आणि योग्य वेळेला जेवणाचा अभाव या सर्व बाबीमुळे मनुष्याचे आरोग्यसंतुलन बिघडत असून त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरीकांनी कामासोबतच आपल्या आरोग्याकडे नियमित लक्ष देण्याची गरज असून त्यासाठी नियमित व्यायामासह सकस आहार योग्य वेळेला घ्यावा. जेणेकरुन आपले शरीर निरोगी राहील. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी महेश धोंगडे, गजानन धोंगडे, अक्षय हजारे, रवि धोंगडे, सुभाष धोंगडे, अनिल दरणे, गोविंदा दरणे, अक्षय पाटील, अजय पाटील, गणेश धोंगडे, गौरव धोंगडे, विनायक घोलप यांच्यासह मोरया ब्लड डोनर ग्रुप व नंदीपेठ मित्रमंडळाने अथक परिश्रम घेवून हा समाजसेवी उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
0 Response to "नंदीपेठ येथे मोफत आरोग्य शिबीराचा १७४ नागरीकांनी घेतला लाभ राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपक्रम"
Post a Comment