-->

एकच पीक न लावता आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीने लागवड करूया ..

एकच पीक न लावता आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीने लागवड करूया ..

 


साप्ताहिक सागर आदित्य 

शेतकऱ्यांनो बदलत्या वातावरणात आपण पण बदलूया


कृषी विभागाचे आवाहन 


वाशिम, एकच पीक न लावता आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीने लागवड करूया ..

वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून सोयाबीन हे पीक मुख्य पीक म्हणून घेतल्या जात आहे. पूर्वी सोयाबीन पीक घेत असताना कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन व्हायचं परंतु एकच एक पीक वारंवार घेतल्याने उत्पादन घटले आणि उत्पादन खर्च वाढला परिणामी शेतकऱ्यांना सोयाबीन हे पीक न परवडणारे झाले. वास्तविक पाहता आपले पूर्वज पट्टा पद्धत, मिश्र पीक, जोड ओळी इत्यादी जाणीवपूर्वक करत होते. आजकालचे अनिश्चित पर्जन्यमान, बदलते वातावरण, तापमान, थंडी, गारपीट, वादळ इत्यादींच्या पार्श्वभूमीवर एक पीक पद्धती संपूर्ण नुकसान होण्याऐवजी बहुपीक पद्धती स्वीकारल्यास एक तरी पीक हाती घेऊन शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळू शकतो. केवळ एकाच पिकावर शेतकरी अवलंबून असल्याने बऱ्याच वेळा उत्पादनात घट झाल्यास शेतकरी हवालदिल होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक, मिश्र पीक पद्धतीचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

मुख्य पिकासोबत आंतरपीक घेणे शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरू शकते; पावसाच्या अनिश्‍चितते मुळे मुख्य पिकाची वाढ व उत्पादन घटले तरी आंतरपिकापासून निश्‍चित उत्पादन मिळते.

आंतरपिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोडत असल्यामुळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम होते, सुपीकता टिकून राहते. कडधान्य व तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्याचा हा हमखास उपाय आहे. आंतरपिके पसरट व बुटकी असल्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन जमिनीची धूप कमी होते.

जमिनीच्या सर्व स्तरातून अन्नद्रव्ये घेण्यास मदत होते. दोन पिकांची मुळांची वाढ भिन्न पद्धतीने होत असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर लाभ होतो.


आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य आणि आंतरपिकाची योग्य निवड

१) मुख्य आणि आंतरपिकाची वाढण्याची सवय भिन्न असावी. उदा. मुख्य पिकाची वाढ सरळ असल्यास आंतरपीक पसरट आणि बुटके असावे.

२) मुख्य आणि आंतरपिकाची मुळांची संरचना तंतुमय असल्यास आंतरपीक शक्यतो सोटमूळ असलेले निवडावे.

३) मुख्य आणि आंतरपिकाच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक असावा. ज्यामुळे दोन्ही पिकांच्या वाढीच्या अवस्था भिन्न राहून उत्पादनवाढीच्या सर्व घटकांचा फायदा दोन्ही पिकांस मिळतो.

४) मुख्य आणि आंतरपीक एकमेकांस स्पर्धक नसावे. उलट ते एकमेकांस पूरक असणे जरुरीचे असते.

५) आंतरपिकापासून जनावर वैरण, कुटुंबांच्या दैनंदिन आहारातील गरजा भागविणारी पिके उदा. डाळवर्गीय पिके निवडावीत.

विविध आंतरपिकांचे नियोजन

सोयाबीन + तूर :

- या पद्धतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आली आहे. सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळींचे प्रमाण हे ४:२ असे ठेवावे.

- उशिरा पेरणीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. खरीप हंगामात एकच पीक घेतले जाते अशा क्षेत्रावर या पद्धतीचा अवलंब करावा.

हळद + मिरची:

या पद्धतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आली आहे. हळद आणि मिरची या पिकांच्या ओळींचे प्रमाण हे सरी वरंबा पद्धतीने ४:१ असे ठेवावे.

कापूस + तूर :

- ही पारंपरिक पट्टा पद्धती आहे. वेगवेगळ्या भागात शेतकरी कापसाच्या विशिष्ट ओळीनंतर तुरीच्या एक किंवा दोन ओळी पेरतात. या आंतरपीक पद्धतीत कापूस संशोधन केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून कापसाच्या ६ किंवा ८ ओळींनंतर तुरीच्या एक ओळ पेरावी अशी शिफारस करण्यात आली.

ज्वारी + तूर :

- ही आंतरपीक पद्धती ३:३ किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आली आहे. ज्वारी आणि तूर सर्वदृष्टीने एकमेकांस पूरक आहेत.

- ज्वारीचे पीक ११० ते ११५ दिवसांत निघून गेल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्ये तुरीच्या पिकास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. ज्वारी काढल्यानंतर तुरीचे पीक जोमाने वाढते. तसेच पीक संरक्षण करण्यात भरपूर वाव मिळतो.

कापूस + सोयाबीन :

- भारी जमीन आणि ज्या ठिकाणी थोडा सखल भाग आहे. अशा भागात कापूस + सोयाबीन या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. आंतरपीक म्हणून सुद्धा हे पीक कापसामध्ये घेता येते.

- कापूस + सोयाबीन १:१ ओळीच्या प्रमाणात पेरावे. सोयाबीनची लवकर येणारी परभणी सोना एमएयूएस-४७ किंवा एमएयूएस-७१ किंवा इतर अशा प्रकारच्या जाती आंतरपिकासाठी निवडाव्यात.

- उशिरा पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या जाती आंरपिकासाठी निवडू नयेत.

बाजरी + तूर :

- कमी पावसाचा भाग, मध्यम जमिनी तसेच उशिरा पेरणीसाठी बाजरी + तूर (३:३, ४:२) या पीक पद्धतीने लागवड करावी.

कापूस + उडीद (१:१) किंवा कापूस + मूग (१:१) आंतरपीक:

- आंतरपीक पद्धती हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीमध्ये शिफारस केलेली आहे. कापसाचे अमेरिकन संकरित जातीच्या लागवडीसाठी ९० × ९० सेंमी आणि सरळ वाण (देशी कपाशी) लागवडीसाठी ९० × ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकण करून मध्ये उडदाचे आंतरपीक घ्यावे.

- उडदासारखीच मुगाची १ ओळ कापसाच्या २ ओळींतील अंतरामध्ये घेण्याची शिफारस आहे.

मका + सोयाबीन (३:३) आंतरपीक :

- मक्याची पट्टा पद्धतीने (७५-४५ सेंमी) लागवड करताना दोन पट्ट्यांतील अंतरामध्ये (७५ सेंमी) सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात.

मका + मूग (२:१) आंतरपीक :

- या आंतरपीक पद्धतीची शिफारस प्रामुख्याने मध्यम ते हलक्या जमिनीसाठी आहे.

- पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उशिरा पेरणीकरिता ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.

- या आंतरपीक पद्धतीत मुख्य आणि आंतरपिकाच्या (६० सेंमी) ओळींचे प्रमाण १:१ ठेवावे.

कापूस + उडीद (१:१) किंवा कापूस + मूग (१:१)

आंतरपीकः- आंतरपीक पद्धती हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम ते भारी जमिनीमध्ये शिफारस केलेली आहे. कापसाचे अमेरिकन संकरित जातीच्या लागवडीसाठी ९० × ९० सेंमी आणि सरळ वाण (देशी कपाशी) लागवडीसाठी ९० × ६० सेंमी अंतरावर कापसाच्या दोन ओळी टोकण करून मध्ये उडदाचे आंतरपीक घ्यावे.- रासायनिक खताच्या नियोजनात कापसाची शिफारस केलेली पूर्ण मात्रा (बीटी कपाशी : १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश आणि अमेरिकन सुधारित जातीसाठी ८० किलो नत्र ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावी. बागायती कपाशी : १५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद, ७५ किलो पालाश विभागून द्यावे).

- उडदासारखीच मुगाची १ ओळ कापसाच्या २ ओळींतील अंतरामध्ये घेण्याची शिफारस आहे.

मका + सोयाबीन (३:३) आंतरपीक :

- मक्याची पट्टा पद्धतीने (७५-४५ सेंमी) लागवड करताना दोन पट्ट्यांतील अंतरामध्ये (७५ सेंमी) सोयाबीनच्या दोन ओळी पेराव्यात.

मका + मूग (२:१) आंतरपीक :

- या आंतरपीक पद्धतीची शिफारस प्रामुख्याने मध्यम ते हलक्या जमिनीसाठी आहे.

- पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उशिरा पेरणीकरिता ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.

- या आंतरपीक पद्धतीत मुख्य आणि आंतरपिकाच्या (६० सेंमी) ओळींचे प्रमाण १:१ ठेवावे.

* ज्वारी+ मुग/ चवळी /उडीद     प्रमाण ३:३             *   सोयाबीन + तीळ     प्रमाण ६:१

* मुग/ उडीद+ तूर     प्रमाण ३:१                                    *  तूर + तीळ     प्रमाण १:२

मुख्य पीक व त्यातील योग्य सहयोगी मिश्रपिके

१. सोयाबीन : मका, तीळ, धने, मेथी, तूर : भोवताली एरंडी, सूर्यफूल (सापळा पिके)

२. कापूस : मका, तूर, मूग, चवळी, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू, हरभरा, भुईमूग

३. हळद: मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी

४. आले (अद्रक): मधुमका, मिरची, घने, झेंडू, चवळी, कांदा

१४. तूर : मूग, सोयाबीन, उडीद, मका, झेंडू

१६. मिरची : एरंडी, मका, तीळ, चवळी, झेंडू, बडीशेप, झेंडू

१७. टोमॅटो : मका, चवळी, झेंडू, धने, कांदा

१८. मका: गजर, करडई, कोथिंबीर, मेथी, पालक

१९. करडई : जवस, हरभरा, कांदा

२.०. फळझाडे

१ सीताफळ चिंच, बोर, आंबा, जांभूळ/कवठ + (आंतरपिके हंगामी २ वर्षे)

२. डाळिंब शेवगा, ग्लिरीसिडीया, सीताफळ, हदगा + (आंतरपिके हंगामी २ वर्षे)

३. आवळा : सीताफळ, हदगा, + (आंतरपिके हंगामी २ वर्षे)

४. पपई : सीताफळ, आंबा, चिकू + (आंतरपिके - हंगामी २ वर्षे)

५. आंबा : चिंच, चारोळी, शेवगा, लिंबू, फणस, जांभूळ, सीताफळ, रामफळ + (आंतरपिके - हंगामी २ वर्षे)

६. चिक्कू : चिंच, लिंबू, आंबा + (आंतरपिके हंगामी - २ वर्षे)


आंतरपिकांचे शास्त्रीय महत्त्व

१. ज्वारी, मका परोपजीवी मित्रकीड : ट्रायकोग्रामा वाहक, पक्षीथांबा, चारा

२. चवळी : रस शोषणाऱ्या किडीसाठी सापळा पीक, द्विदल नत्र पुरवठा, तणविरोधक, बायोमास

३. सूर्यफूल : मधमाश्या, पक्षिथांबा

४. धने : औषधी गुणधर्म, रोगरोधक, परोपजीवी बुरशी ट्रायकोडर्मा वाहक

५. मोहरी : आयसोथायोसायनेट द्रव्यामुळे तणांचे बी मारते, झिंक पुरवठा, कोबीसाठी घाण्या रोगरोधक

६. झेंडू : अल्फा टर्थीनाईल द्रव्य निमॅटोडरोधक

७. हरभरे : अॅमिनो अॅसिड, कीडरोधक, नत्र पुरवठा (द्विदल)

८. तीळ : औषधी गुणधर्म, मधमाश्या आकर्षक, परागीकरणास मदत

९. रानवांगे : पांढरी माशी नियंत्रक

१०. कांदा : सल्फर पुरवठा, तणविरोधक, सापळा पीक, उत्तम बायोमास (गांडूळ वृद्धी)

चला तर मग,

आंतरपीक,मिश्र पिक घेऊ...

अधिकचे उत्पन्न घेऊ..

बदलत्या वातावरणाने होणारा धोका टाळूया..


अनिसा महाबळे

प्रकल्प संचालक आत्मा, वाशिम


संकलन : जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

0 Response to "एकच पीक न लावता आंतरपीक, मिश्रपीक पद्धतीने लागवड करूया .."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article