
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक जिल्हास्तरावर आचार संहिता नियंत्रण कक्ष कार्यान्वीत
साप्ताहिक सागर आदित्य
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक
जिल्हास्तरावर आचार संहिता नियंत्रण कक्ष कार्यान्वीत
वाशिम, : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हयातील 287 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांची आदर्श आचार संहिता नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 18 डिसेंबर रोजी मतदान आणि 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर आचार संहिता नियंत्रण कक्ष स्थापन करुन कार्यान्वीत करण्यात आला आहे. आचार संहिता तक्रार निवारण कक्ष नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसिलदार कैलास देवळे हे आचार संहिता नियंत्रण कक्षात काम पाहतील. हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील नैसर्गिक आपत्ती कक्षात कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षातील दूरध्वनी क्रमांक (07252) 234238 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 8379929415 हा आहे. आचार संहिताबाबतच्या तक्रारी/ मार्गदर्शनासाठी उमेदवार, राजकीय पक्ष व मतदारांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
आचार संहितेबाबतच्या तक्रारीची नोंद संबंधित अधिकारी व कर्मचारी हे नोंदवहीत घेतील. प्राप्त तक्रार संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी/ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा संबंधित विभाग प्रमुख यांचेकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पाठवतील. तक्रारीचा संबंधिताकडून अहवाल प्राप्त करुन घेवून संबंधित तक्रारदाराला कळवून त्याची नोंद दिनांक व वेळेसह नोंदवहीत घेतील. प्राप्त होणाऱ्या तक्रारी हया तोंडी/ लेखी/ ई-मेल/ लघु संदेश (एसएमएस)/ दूरध्वनी आणि टोल फ्री क्रमांकावरुन प्राप्त होणार आहे. प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद रजिस्टरमध्ये घेणे त्याबाबत वरील प्रमाणे कार्यवाही करुन त्याची माहिती नायब तहसिलदार देवळे व आचार संहिता विभाग प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी यांना करुन देण्यासाठी विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
आचार संहिता तक्रार निवारण कक्षाकडे दैनंदिन प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत देवळे हे दररोज जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांना माहिती देतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या कारणास्तव केली आहे. या कामात हलगर्जीपणा व कसूर केल्याचे दिसून आल्यास संबंधिताविरुध्द निवडणूक कायदयान्वये वेळ प्रसंगी फौजदार तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक कालावधीत कोणत्याही परिस्थितीत अनुपस्थित राहू नये. तसेच त्यांच्या रजा देखील मंजूर करण्यात येणार नसल्याचे आचार संहिता विभाग प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
0 Response to "ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक जिल्हास्तरावर आचार संहिता नियंत्रण कक्ष कार्यान्वीत"
Post a Comment