
9 ते 11 सप्टेंबरपर्यंत कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश
साप्ताहिक सागर आदित्य
9 ते 11 सप्टेंबरपर्यंत
कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, : जिल्हयात 31 ऑगस्ट रोजी श्री गणेश स्थापना झाली असून स्थापना झालेल्या श्री गणेशाचे विसर्जन 9 ते 11 सप्टेंबर 2022 या काळात सार्वजनिकरित्या मिरवणूका काढून करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूकीदरम्यान गणेश मंडळाकडून मिरवणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनावर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशुल व कटयार असे प्रत्येक वाहनावर घातक व मारक शस्त्र लाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पार्श्वभूमि आहे. जिल्हा जातीयदृष्ट्या संवेदनशील आहे. सार्वजनिक सण-उत्सव काळात व ईतर कारणावरुन जातीय दंगली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पुर्व इतिहास आहे. जातीय दंगलीचे व गणेशोत्सव काळात दाखल गुन्हयांच्या आकडेवारीनुसार जिल्हा सण-उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशिल असल्याचे स्पष्ट होते. जातीय दंगलीच्या गुन्हयात सुध्दा तलवारीचा वापर करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे.
श्री गणेश विसर्जन दरम्यान एखादा अनुचित प्रकार घडून जातीय दंगल घडून आल्यास विसर्जनादरम्यान शक्ती प्रदर्शनाकरीता वाहनांवर लावण्यात आलेल्या घातक शस्त्रांचा उपयोग एकमेकांविरुध्द मारक शस्त्र म्हणून निश्चित होवू शकतो. त्यामुळे जीवित हानी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्री गणेश विसर्जना दरम्यान वाहनावर शक्ती प्रदर्शन करण्याचे उद्देशाने लावण्यात येणाऱ्या तलवार, त्रिशुल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कटयावर इत्यादी धारदार घातक शस्त्रांवर बंदी घालणे आवश्यक आहे. या करीता श्री गणेश विसर्जन मिरवणूक काळात 9 ते 11 सप्टेंबर 2022 या दरम्यान संपूर्ण जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व मंडळाचे पदाधिकारी यांच्याविरुध्द पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.
0 Response to "9 ते 11 सप्टेंबरपर्यंत कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश"
Post a Comment