
शाळांनी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करा डायेट प्राचार्यांचे स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांना आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
शाळांनी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करा
डायेट प्राचार्यांचे स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांना आवाहन
वाशिम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या लक्ष साध्यतेच्या दृष्टीने शालेय शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागाचे महत्व लक्षात घेता खाजगी क्षेत्राच्या सक्रीय सहभागासाठी विद्यांजली हे पोर्टल विकसित केले आहे.बदलत्या काळानुसार शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविता यावे,स्वयंसेवी संस्था,स्वयंसेवक जे शाळेला विविध प्रकारे मदत करू इच्छितात व शाळा यांना एकच प्लॅटफॉर्म विद्यांजली पोर्टल उपलब्ध करून देत आहे.
विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शाळांना विविध साहित्य व सेवा पुरविल्या जाऊ शकतात. शाळांनी सर्व प्रथम आपला यु डायस क्रमांक वापरून नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर या पोर्टलवर लॉगिन करून आपल्या शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा व साहित्याबाबतची माहिती नोंदवावी. सेवेच्या स्वरूपात विषय अध्यापनात सहकार्य,कला कार्यानुभव,योग, क्रीडा,भाषा,व्यावसायिक कौशल्य यांचे अध्यापन करणे, दिव्यांग विद्यार्थ्याना अध्ययनास सहकार्य करणे, प्रौढ शिक्षणात सहभाग, व्यवसाय मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पौष्टीक आहार मार्गदर्शन याबाबत सेवा घेता येऊ शकते.
साहित्य व उपकरणाच्या संदर्भाने डिजिटल साहित्य,वर्गातील साहित्य,खेळ, योगा, आरोग्य व सुरक्षा साहित्य,अध्ययन अध्यापन साहित्य, कार्यालयीन स्टेशनरी, देखभाल दुरुस्ती, गरजेनुसार साहित्य,विज्ञान प्रयोगशाळा,पिण्याच्या पाण्याची सुविधा व पाण्याची टाकी,ग्रंथालय, कला व कार्यानुभव कक्ष,संरक्षण भिंत व प्रवेशद्वार याबाबत मागणी करता येईल.जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नागरे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदानीत शाळांनी विद्यांजली या पोर्टलवर http://vidyanjali.education.gov.in जाऊन जास्तीत
जास्त शाळांनी नोंदणी व आपल्याला हवे असलेल्या सेवा व साहित्य याबाबत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक जे शाळांना विविध प्रकारे मदत करू इच्छितात त्यांनी देखील या पोर्टलवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.या उपक्रमाबाबत जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. सुलक्षणा पवार यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.तरी नोंदणी करण्याबाबत काही अडचण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, डॉ.ज्ञानेश्वर नागरे यांनी केले आहे.
0 Response to "शाळांनी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करा डायेट प्राचार्यांचे स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांना आवाहन"
Post a Comment