-->

राज्यात अतिवृष्टीचे १०८ बळी; विदर्भात मात्र पूरस्थिती कायम, २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित

राज्यात अतिवृष्टीचे १०८ बळी; विदर्भात मात्र पूरस्थिती कायम, २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित


साप्ताहिक सागर आदित्य/

मुंबई : राज्यात आतापर्यंत झालेल्या  मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीत  १०८ जणांचा बळी गेला आहे. कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोकणातील परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात मात्र पूरस्थिती कायम आहे.पुरामुळे २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर १ हजार ३६८ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

 कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलैपर्यंत सायंकाळी ०७ ते सकाळी ०६ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच राजापूर कोल्हापूरला  जोडणारा अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ एनडीआरएफ  टीम तैनात करण्यात आल्या आहेत.२६ गावांना पुराचा वेढानागपूर : आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी यवतमाळ जिल्ह्यातील ११ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १५ अशी २६ गावे पुराने वेढली आहेत. यवतमाळच्या वणी तालुक्यातील  तीन गावांची स्थिती गंभीर आहे. या भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी वर्धा येथून राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक वणीकडे निघाले आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यातच बेंबळा प्रकल्पासह जिल्ह्यातील आठ प्रकल्पातून पाणी सोडल्याने बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब आणि वणी या पाच तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. वर्धा व वैनगंगा नदीला पूर आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर व पोंभूर्णा तालुक्यातील गावे सर्वाधिक बाधित आहेत.

बुलडाणा, अकोल्यात पूरपरस्थिती कायमबुलडाणा : जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पावसाने मंगळवारी उसंत घेतली. तरीही पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील येरळी पुलावर पाच ते सहा फूट पाणी मंगळवारीही वाहत होते. मलकापूर तालुक्यात विश्वगंगा नदीच्या पुरामुळे काळेगाव, वान नदीच्या पुरामुळे कोलद, वडगाव वान, दानापूर या गावांचा संपर्क तुटलेलाच होता. पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी होत आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचा पूर कायम आहे. यामुळे अकोट-अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. देवरी-अंदुरा व शेगाव रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तेल्हारा तालुक्यातील पूर्णा, गौतमा, विद्रुपा नद्यांना पूर असल्याने नेर, पिवंदळ, सांगवी, उमरी या गावांचा संपर्क तुटला आहे.वणी येथे ११ गावांमध्ये पूरस्थिती ‘जैसे थे’ अमरावती : अमरावती जिल्ह्यात २४ तासांत सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. शहानूर नदीला पूर आल्याने एक जण वाहून गेला, तर चांदूरबाजार तालुक्यात भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू झाला आहे. येवदा गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात येरड येथील बेंबळा व मिलमिली नदीला पूर आल्याने नदीकाठालगतची पिके वाहून गेली. वर्धा जिल्ह्यातील शेकडो एकर शेती अजूनही पाण्याखालीच असून अनेक गावांतील शेतावरील विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही

Related Posts

0 Response to "राज्यात अतिवृष्टीचे १०८ बळी; विदर्भात मात्र पूरस्थिती कायम, २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article