-->

प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले

प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ११ लाखांहून अधिक रुग्णांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला असून, त्यासाठी शासनाने २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.


राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना आरोग्य संरक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनांमध्ये कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, अवयव प्रत्यारोपण, अपघात आणि अन्य गंभीर आजारांसह २ हजार ३९९ उपचार व शस्त्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे. राज्यातील पाच हजारांहून अधिक शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतात. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे.


राज्यात आजअखेर ४ कोटी ४५ लाख आयुष्मान कार्डे आणि १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांची वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांनी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या आधारे आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकाने किंवा आयुष्मान ॲपद्वारे कार्ड तयार करून घ्यावे. योजनांची माहिती व तक्रारींसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या १५५३८८ किंवा १८००२३३२२००, तर आयुष्मान भारत योजनेच्या १४५५५ किंवा १८००१११५६५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.


0 Response to "प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article