भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण
रिसोड : माजी खासदार तथा दि. आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारत प्राथमिक मराठी शाळेत ‘जय पारितोषिक’ योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारत प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, गटशिक्षणाधिकारी बद्रीनारायण कोकाटे, अमृताताई देशमुख, माजी मुख्याध्यापिका शीलाताई उकळकर, प्राचार्य संजय भांडेकर, प्राचार्या मंजुषाताई देशमुख, रोजमेरी, विलासराव देशमुख, मुख्याध्यापिका किरणताई दुबे, प्रभाकर पाटील, निनादराव देशमुख, जयंत वसमतकर, केशव गरकळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला-कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या संकल्पनेतून ‘जय पारितोषिक योजना’ सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
यानंतर ‘जय पारितोषिक’ योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी दि आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतरावजी देशमुख व जयश्रीताई देशमुख सदैव प्रयत्नशील असतात. असे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी ‘एआय’चे ज्ञान आत्मसात करण्यासोबतच त्याचा जबाबदारीने वापर करावा, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’ निर्माण करून स्वच्छता, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी, अनंतरावजी देशमुख यांनी दि. आर्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाचा वटवृक्ष उभा केल्याचे गौरवोद्गार काढले. संस्थेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिस्त, नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच शिस्त व चांगले संस्कार अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात जयश्रीताई देशमुख यांनी विद्यार्थ्यांमधील विविध सुप्त क्षमतांच्या विकासासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता व्यक्त केली. अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी महत्त्वाकांक्षी राहून अभ्यासूवृत्ती जोपासावी, असे त्यांनी सांगितले. जीवनात यशाचे शिखर गाठण्यासाठी मेहनत, जिद्द आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय वाघ यांनी केले. हरीश चवरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "भारत प्राथमिक शाळेत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वितरण "
Post a Comment