घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 बाबत समाजमाध्यमातुन जनजागृती अभियान सीईओ अर्पित चौहान; 15 ऑगस्ट पासुन शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 बाबत समाजमाध्यमातुन जनजागृती अभियान
सीईओ अर्पित चौहान; 15 ऑगस्ट पासुन शुभारंभ
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदच्या वतीने 15 ऑगस्ट पासुन समाज माध्यमाच्या आधारे जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन दि. 15 ते 24 ऑगस्ट 2026 या 10 दिवसाच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन खुळे यांनी दिली.
या अभियानात 10 दिवस दररोज घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर सोशल मीडिया, पोस्टर, इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ व इतर IEC माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
अभियानाच्या पहिल्या दिवशी ‘स्वच्छ पर्यावरण हा मूलभूत अधिकार’ या विषयातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर घरगुती कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण, उघड्यावर कचरा न टाकणे, झाकलेल्या घंटागाडीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिकमुक्त गाव, बल्क वेस्ट जनरेटर यांची जबाबदारी, जुन्या कचऱ्याची वैज्ञानिक विल्हेवाट, शाळा-अंगणवाडी व सार्वजनिक संस्थांची भूमिका तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाई आदी विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
-------------------------------
जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, युवक तसेच ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनीही सोशल मीडियावरून अभियानातील संदेश जास्तीत जास्त शेअर करून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीस हातभार लावावा.
स्वच्छ गाव-सुरक्षित पर्यावरण या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 बाबत नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडविण्यावर भर देण्यात येणार आहे.
-------------------------------
“ जास्तीत जास्त लोकांना जागृत करण्यासाठी ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी अभियानाशी संबधित संदेश समाजमाध्यमांवर शेअर करुन या अभियानात सहभागी व्हावे.”
-अर्पित चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम.
---------------------------------
-राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 बाबत समाजमाध्यमातुन जनजागृती अभियान सीईओ अर्पित चौहान; 15 ऑगस्ट पासुन शुभारंभ"
Post a Comment