पावसाचा मोठा खंड; रब्बीसाठी ‘मर्यादित ओलावा’ आधारित नियोजन करा कृषी विभागाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
🌾 पावसाचा मोठा खंड; रब्बीसाठी ‘मर्यादित ओलावा’ आधारित नियोजन करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, : खरीप हंगाम २०२६ मध्ये ऑगस्ट महिन्यात वाशिम जिल्ह्यात ७६.३२ टक्के पावसाचा तुटवडा नोंदविण्यात आला आहे. सलग तीन ते चार आठवड्यांच्या पावसाच्या खंडामुळे जमिनीतील नैसर्गिक ओलावा घटला आहे. जिल्ह्यातील मुख्य जलसाठा सध्या केवळ ४० टक्के असून तो पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा रब्बी हंगाम आव्हानात्मक ठरणार असल्याने कालवे अथवा उपसा सिंचनावर अवलंबून न राहता उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर आधारित शास्त्रोक्त पिक नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड महत्त्वाची
भारी खोल काळ्या जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहत असल्याने खोल मुळे जाणारी करडई, देशी कोरडवाहू हरभरा आणि जवस या पिकांची निवड करावी. करडईसाठी १० ते १२ किलो, देशी कोरडवाहू हरभऱ्यासाठी ६५ ते ७० किलो आणि जवसासाठी २५ ते ३० किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे. मध्यम काळ्या जमिनीत कमी कालावधीत येणारी व ताण सहन करणारी रब्बी ज्वारी व मोहरी, तसेच सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास चिया पिकाची लागवड करावी. हलकी व उथळ जमीन असल्यास आणि सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यास रब्बीची पेरणी करू नये. अशी जमीन पडीक ठेवून खरीप पिकांच्या अवशेषांचे आच्छादन म्हणजेच मल्चिंग करावे.
झिरो टिलेजसह सहा तंत्रज्ञानांचा अवलंब करा
रब्बी पिकांची उत्पादकता टिकविण्यासाठी झिरो टिलेज अर्थात शून्य मशागतीचा अवलंब करावा. सोयाबीन काढणीनंतर नांगरट न करता ‘झिरो टिल सीड कम फर्टीलायझर ड्रिल’च्या साह्याने उपलब्ध मूळ ओलाव्यावर थेट पेरणी करावी. पेरणी १५ ऑक्टोबरपूर्वी ५ ते ६ सेंटीमीटर खोलीवर ओलाव्याच्या थरात पूर्ण करावी. बियाण्यास थायरम + कार्बेन्डाझिम (३ ग्रॅम प्रति किलो) किंवा ट्रायकोडर्मा तसेच रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
उगवणीनंतर १५ ते २० दिवसांत विरळणी करून झाडांची संख्या २० टक्के कमी ठेवावी. पिकांमध्ये पाण्याचा ताण निर्माण होऊ नये यासाठी ओळींमध्ये भुशाचे आच्छादन करावे. पाण्याचा ताण जाणवल्यास पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) किंवा युरिया (२ टक्के) यांची फवारणी करावी. हरभरा पीक २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर शेंडे खुडण्याचे तंत्र अवलंबावे.
गहू, मका आणि मोकाट सिंचन टाळावे
मर्यादित पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक पाण्याच्या पाळ्या लागणाऱ्या गहू व मका पिकांची लागवड टाळावी. पाण्याअभावी या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मोकाट अथवा फ्लड सिंचन पूर्णपणे टाळून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि पाण्याची उपलब्धता यांचा विचार करूनच रब्बी हंगामाचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
0 Response to "पावसाचा मोठा खंड; रब्बीसाठी ‘मर्यादित ओलावा’ आधारित नियोजन करा कृषी विभागाचे आवाहन"
Post a Comment