माय भारत स्वयंसेवकांकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; अडीअडचणी जाणून घेतल्या
🌿 सेवा संकल्प अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांशी साधला आत्मीय संवाद
साप्ताहिक सागर आदित्य
माय भारत स्वयंसेवकांकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; अडीअडचणी जाणून घेतल्या
📍 वाशिम, : सेवा संकल्प अभियानांतर्गत मेरा युवा भारत केंद्र, वाशिमच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील चित्रऋषी महाराज वृद्धाश्रमात संवाद व सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी आत्मीय संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या.
कार्यक्रमास जिल्हा युवा अधिकारी कु. आरुषी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गृहपाल व्ही. एम. लाकडे, शासकीय निवासी मुलींचे वसतिगृहाच्या अधीक्षिका स्वाती अकोलकर आणि विद्यालयाचे प्राचार्य अभिजीत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कु. आरुषी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, त्यांचा सन्मान तसेच केंद्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधांबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधणे ही सामाजिक जबाबदारी असून, युवा पिढीने माय भारत केंद्राच्या माध्यमातून अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य अभिजीत राठोड यांनी गेल्या ३७ वर्षांपासून वृद्धाश्रमामार्फत ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. माय भारत स्वयंसेविका व युथ आयकॉन आकांक्षा गायकवाड, अंजली इंगोले आणि दीक्षा भगत यांनी कु. आरुषी यांच्यासमवेत ज्येष्ठ नागरिकांशी सामूहिक संवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. सरपाते यांनी केले, तर आभार एस. सी. चव्हाण यांनी मानले. यावेळी माय भारत केंद्राचे स्वयंसेवक निलेश खोरने, अनिल चव्हाण, नारायण गिरी यांच्यासह विद्यालयातील कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी तसेच शासकीय निवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
#सेवासंकल्पअभियान #मायभारत #ज्येष्ठनागरिकदिन #ज्येष्ठनागरिक #वाशिम #मंगरूळपीर #सामाजिकजबाबदारी #युवासहभाग
0 Response to "माय भारत स्वयंसेवकांकडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; अडीअडचणी जाणून घेतल्या"
Post a Comment