ग्रामीण विकासाला मिळणार कॉर्पोरेट गती: सीईओ अर्पित चौहान जिल्हा परिषदेचे 'सीएसआर पार्टनरशिप पोर्टल' कार्यान्वित
साप्ताहिक सागर आदित्य
ग्रामीण विकासाला मिळणार कॉर्पोरेट गती: सीईओ अर्पित चौहान
जिल्हा परिषदेचे 'सीएसआर पार्टनरशिप पोर्टल' कार्यान्वित
आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ग्रामीण भागातील विकासकामांना कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीची जोड देण्यासाठी जिल्हा परिषदेचे 'सीएसआर पार्टनरशिप पोर्टल' आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे.
नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा उपक्रमांतर्गत समाविष्ट वाशीम जिल्हा व मालेगाव तालुक्यातील १४ ते १५ लाख नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे पोर्टल अत्यंत मोलाचे ठरेल. जिल्ह्यातील ७५९ जिल्हा परिषद शाळा, १९८ आरोग्य केंद्र आणि १०७४ अंगणवाडी केंद्रांच्या कायाकल्पासाठी या पोर्टलद्वारे उद्योग जगताला थेट गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील व इतर कंपन्यांनी आपला सीएसआर निधीचा वापर ग्रामीण भागातील विकासकामांकरीता करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------------
पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये:
• ४० हून अधिक पारदर्शक प्रकल्प: आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पाणी व स्वच्छता, पोषण आणि महिला उपजीविका या ६ प्रमुख क्षेत्रांतील ४० हून अधिक तयार प्रकल्पांची माहिती, उद्दिष्टे व खर्चाच्या तपशिलासह पोर्टलवर उपलब्ध.
• उद्योगानुकूल व लवचिक धोरण: कंपन्यांना स्वतःच्या संकल्पनेनुसार प्रकल्प सुचवण्याची पूर्ण मुभा. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यापासून ते थेट अंमलबजावणीपर्यंत जिल्हा परिषद संपूर्ण सहकार्य करणार.
• जागतिक व राष्ट्रीय ध्येयांशी सुसंगत: सर्व प्रकल्प संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्ट (एसडीजी) तसेच 'विकसित भारत @२०४७' च्या ध्येयाशी जोडलेले असल्याने कंपन्यांना त्यांच्या बीआरएसआर आणि इएसजी अहवालांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार.
• पारदर्शक आणि वेगवान कामकाज: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रैमासिक आढावा, 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' डॅशबोर्डद्वारे डिजिटल देखरेख आणि अवघ्या ६० दिवसांत उपयोगिता प्रमाणपत्र (युसी) देण्याची हमी.
• सरळ व सुलभ नोंदणी: इच्छुकांसाठी zpwashim.gov.in या संकेतस्थळावर 'वन-क्लिक' अर्ज सुविधा उपलब्ध असून, प्राप्त अर्जांवर अवघ्या ५ कार्यदिवसांत कार्यवाही केली जाईल.
• विशेष म्हणजे सदर पोर्टल हे जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात आले असुन यासाठी कोणाताही अतिरिक्त खर्च करण्यात आला नाही.
-------------------------------------------
“ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधताना प्रशासकीय प्रयत्नांना कॉर्पोरेट जगताच्या सहकार्याची जोड मिळणे काळाची गरज आहे. नामांकित कंपन्याच्या सीएसआर निधीतुन जिल्ह्यात डिजिटल वर्गखोल्या, हायटेक संगणक प्रयोगशाळा, कर्करोग निदान यंत्रे, उच्च दर्जाच्या स्वच्छता प्रणाली आणि महिला बचत गटांसाठी उपजीविका प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू आहेत. जिल्हा परिषदेने तयार केलेले हे नवीन डिजिटल पोर्टल शासन आणि उद्योगक्षेत्रातील सहकार्याचा एक नवा आदर्श वस्तूपाठ निर्माण करेल असा मला विश्वास आहे.”
-अर्पित चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम.
0 Response to "ग्रामीण विकासाला मिळणार कॉर्पोरेट गती: सीईओ अर्पित चौहान जिल्हा परिषदेचे 'सीएसआर पार्टनरशिप पोर्टल' कार्यान्वित"
Post a Comment