गावनिहाय पाणी गुणवत्तेची होणार तपासणी
साप्ताहिक सागर आदित्य
स्टॉप डायरिया अभियान राबवा: सीईओ अर्पित चौहान
गावनिहाय पाणी गुणवत्तेची होणार तपासणी
पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमिवर सर्व गावात स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केले आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी आरोग्य विभाग, सर्व विभाग प्रमुख आणि सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार असून, सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसर स्वच्छता आणि योग्य स्वच्छताविषयक पद्धतींचा अवलंब केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अभियानादरम्यान गावनिहाय पाणी गुणवत्तेची खात्री करण्यासाठी सर्व स्रोतांची नियमित चाचणी केली जाईल. विद्यार्थी व स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती दुरुस्ती, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरणा तसेच पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरिनीकरण करून नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात किमान ०.२ पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरोन राखण्यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभुमिवर जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे यांनी बुधवारी (दि.8) संबंधित कर्मचारी यांची बैठक घेऊन निर्देश दिले.
---------------------------------------
“सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि चांगल्या सवयींच्या माध्यमातून अतिसारमुक्त व निरोगी वाशिम घडविण्यासाठी जल सुरक्षकांना सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असून नागरिकांच्या सहकार्यामुळे हे अभियान यशस्वी ठरेल.”
-गजानन खुळे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन
----------------------------------------
फोटो ओळी: स्टॉप डायरिया बाबत माहिती देतांना प्रकल्प संचालक गजानन खुळे
-----------------------------------------
-राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
----------***----------
0 Response to "गावनिहाय पाणी गुणवत्तेची होणार तपासणी "
Post a Comment