युवकांच्या सर्जनशीलतेतून घुमला व्यसनमुक्तीचा संदेश! 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
युवकांच्या सर्जनशीलतेतून घुमला व्यसनमुक्तीचा संदेश!
'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न
व्यसनमुक्त, निरोगी आणि जबाबदार समाज घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याच उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या 'माय भारत' उपक्रमांतर्गत आयोजित 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा २८ जुलै २०२६ रोजी राजस्थान आर्य महाविद्यालय, वाशिम येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
'माय भारत' वाशिमचे जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांतील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रेरित करणे, सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ करणे आणि 'विकसित भारत' घडविण्यात युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धांमध्ये सामूहिक लोकगीत, सामूहिक नृत्य, पथनाट्य, वैयक्तिक चित्रकला, लघुपट अथवा रील निर्मिती, घोषवाक्य लेखन, मौखिक काव्य सादरीकरण (स्लॅम पोएट्री) तसेच वक्तृत्व अशा विविध प्रकारांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत सहभागी युवक-युवतींनी व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांचे योगदान या विषयांवर प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेतील सादरीकरणांचे परीक्षण करून प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निश्चित करण्यात आले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, प्रा. डॉ. किशोर इंगोले, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश झंवर, कैलास गोरमे तसेच कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धांमुळे युवकांच्या कलागुणांना नवी दिशा मिळाली. कला, साहित्य आणि प्रभावी अभिव्यक्तीच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा प्रेरणादायी संदेश देत युवकांनी सामाजिक परिवर्तनात आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी युवक-युवती, परीक्षक, महाविद्यालय प्रशासन आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.
व्यसनमुक्त युवा... सक्षम समाज... विकसित भारत! 🇮🇳
0 Response to "युवकांच्या सर्जनशीलतेतून घुमला व्यसनमुक्तीचा संदेश! 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न"
Post a Comment