-->

जलतारा अभियान' जलसंधारणाच्या दिशेने ठोस पाऊल       मंगरूळपीर येथे जलतारा प्रकल्प कार्यशाळा उत्साहात संपन्न

जलतारा अभियान' जलसंधारणाच्या दिशेने ठोस पाऊल मंगरूळपीर येथे जलतारा प्रकल्प कार्यशाळा उत्साहात संपन्न



 साप्ताहिक सागर आदित्य 

'जलतारा अभियान' जलसंधारणाच्या दिशेने ठोस पाऊल     

मंगरूळपीर येथे जलतारा प्रकल्प कार्यशाळा उत्साहात संपन्न 

वाशिम , पाणी हे जीवन आहे आणि त्याचे व्यवस्थापन हा आपला सामूहिक जबाबदारीचा विषय आहे. जलतारा प्रकल्प हा केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून नव्हे तर एक समाजाभिमुख उपक्रम म्हणून पाहिला पाहिजे. या अभियानाच्या माध्यमातून जलसाठा वाढेल, भूजल पातळी टिकून राहील आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल.ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि जलसंधारणाच्या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.


     सांस्कृतिक भवन, मंगरूळपीर येथे दि.८ मार्च रोजी जलतारा अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जलसंधारण व जलव्यवस्थापनावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरूळपीर यांच्या वतीने करण्यात आले होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून .ठाकरे बोलत होते.


    कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे यांच्याहस्ते संपन्न झाले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी (कारंजा) कैलास देवरे, उपविभागीय अधिकारी (मंगरूळपीर) राजेंद्र जाधव, तहसीलदार शितल बंडगर, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके,गटविकास अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, प्रकल्प संशोधक पुरूषोत्तम वायाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकुमार गावंडे, रामकृष्ण पाटील, विजय चव्हाण, डॉ.हरिष बाहेती, सतिश बाहेती,पाणी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


    . ठाकरे यांनी आपल्या मनोगतात जलसंधारणाच्या गरजेवर, जलतारा प्रकल्पाच्या लाभांवर आणि स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.पुढे ते म्हणाले, सुभाषरावजी ठाकरे मंत्री होते तेव्हा त्यांनी जलसंधारणाची अनेक कामे हाती घेतली होती. अनेक तलाव, मध्यम प्रकल्प ,धरणांना मंजुरी आणली होती. वाशिम जिल्ह्यात हरित क्रांती व्हावी हे ठाकरे साहेबांचे स्वप्न होते.शासन आणि प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, पण खरा बदल ग्रामस्थांच्या सहभागातूनच येईल. गावपातळीवर लोकसहभाग वाढला तर जलतारा प्रकल्पाच्या यशाची हमी मिळेल.जलबचत  प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी मानली पाहिजे. जिल्हा परिषद या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा देईल आणि ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.असेही त्यांनी यावेळी सांगितले.


    खोडे यांनी जलसंधारणाच्या महत्त्वावर आणि जलतारा प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर भर दिला.ते म्हणाले,पाणी हे टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. जलतारा प्रकल्पामुळे शेतीस मदत होईल, पाण्याची टंचाई दूर होईल आणि भविष्यातील पाणी समस्या सोडवता येईल. प्रशासन आणि ग्रामस्थांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करावा.तसेच ग्रामस्थांनी जलसंधारण उपक्रमात पुढाकार घ्यावा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.


     जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जलसंधारणाचे महत्त्व, जलतारा प्रकल्पाची गरज आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दिशेने प्रशासनाच्या भूमिका यावर भर दिला.त्या म्हणाल्या,जल ही आपल्या भविष्यासाठी अत्यंत मौल्यवान संसाधन आहे. योग्य पद्धतीने जलसंधारण न केल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होऊ शकते. जलतारा ही लोकचळवळ  केवळ पाण्याचा साठा वाढवण्यासाठी नाही, तर जमिनीतील पाण्याची पातळी टिकवण्यासाठीही महत्त्वाची आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन, कृषी विभाग, महसूल विभाग आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे.तसेच महिला दिनाच्या निमित्ताने महिला शेतकरी व जलसंधारणातील महिलांचे योगदान यावरही त्यांनी भाष्य केले.महिला केवळ घरचं पाणी व्यवस्थापित करत नाहीत, तर शेती आणि जलसंधारणातही मोलाची भूमिका बजावतात. त्यांचा सन्मान हा संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.जलतारा प्रकल्पासारख्या संकल्पनांमुळे जिल्ह्यातील जलस्रोत अधिक सक्षम होतील. प्रशासन या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध  असल्याचे त्यांनी सांगितले.


     वायाळ यांनी जलतारा प्रकल्प व जलसंधारणाच्या संकल्पनेवर  मार्गदर्शन केले. या अभियानात जवळपास दोनशेच्यावर गावांमध्ये वैशिष्ट्यपुर्ण यश मिळविले असुन  पाण्याच्या समस्येवर मात करता येते. शेतीसाठी हा प्रकल्प फायदेशीर असुन  पाणी पातळीत वाढ होणे,अतिवृष्टीमुळे शेतातील गाळ,खते वाहुन न जाता पाण्याचा योग्य निचरा होवुन पिके सुरक्षित राहतात.शेतकरी बारामाही पिके घेवु शकतात आर्थिक स्थिती सुधारायला मदत होऊन बेरोजगारी,व्यसनाधीनता ,शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आळा घालण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.


जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

उच्च मूल्याच्या पिकाची ओळख - चिया' या त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे प्रतिष्ठित स्कोच ऑर्डर-ऑफ-मेरिट उपांत्य फेरीमध्ये स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्वतंत्र सन्मानांपैकी एक मानला जातो. म्हणून  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या गौरव सन्मान करण्यात आला. या सन्मानाने कार्यक्रमाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले.कार्यशाळेत जलसंधारण क्षेत्रातील एक महत्त्वाचा उपक्रम  असून, यामुळे परिसरातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होईल.असा सुर या कार्यशाळेत निघाला.संचालन मनोज इंगोले तर आभार रामकृष्ण पाटील यांनी मानले.

   कार्यक्रमाला महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Posts

0 Response to "जलतारा अभियान' जलसंधारणाच्या दिशेने ठोस पाऊल मंगरूळपीर येथे जलतारा प्रकल्प कार्यशाळा उत्साहात संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article