
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविणार
साप्ताहिक सागर आदित्य
११ ते १७ ऑगस्ट दरम्यान
हर घर तिरंगा उपक्रम राबविणार
वाशिम भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात,स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात क्रांतिकारक/ नायक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे,स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे आणि देशभक्तीची जाज्जल भावना कायमस्वरूपी जनमाणसात राहावी, या उद्देशाने भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत " हर घर तिरंगा " हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकांच्या घरावर त्याचप्रमाणे सर्व शासकीय/ निमशासकीय/खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था, पोलिस यंत्रणा व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यात येणार आहे.
राष्ट्रध्वज तिरंगा हा निशुल्क मिळणार नाही. त्यासाठी नागरिकांनी तो स्वेच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी तिरंगा ध्वजाची संख्या निश्चित करण्याचे काम जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे करणार आहे. या उपक्रमासाठी शाळा,महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्रसेना, बचत गट व युवा मंडळे यांच्यामधून तिरंगा स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहे.पालकमंत्री,खासदार, आमदार,स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी/ सदस्य व इतर प्रतिष्ठित खेळाडू व अधिकारी यांच्याकडून नागरिकांना या उपक्रमास सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.
प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. भारतीय ध्वजसंहिता -२००२ नुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत/पॉलिस्टर/लोकर/ सिल्क/ खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत.भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते- अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यात येणार आहे.
नागरिकांमध्ये " हर घर तिरंगा " या उपक्रमाबाबत आवड निर्माण करण्यासाठी संकेतस्थळे, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा,शाळा व महाविद्यालये परिवहन सेवा,आरोग्य केंद्रे, रास्त भाव धान्य दुकाने आणि नगरपालिका/ नगरपंचायती यांचे कृती आराखडे निश्चित करण्यात येणार आहे.प्रत्येक गावात व शहरातील वार्डात ध्वज वितरण आणि विक्री केंद्र निश्चित करण्यात येणार आहे.
आरोग्य उपकेंद्रे,प्राथमिक आरोग्य केंद्र,सामुदायिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हा रुग्णालय यांचा या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे.प्रसुतीगृहात सहाय्यक परिचारिका ह्या तिरंग्याची माहिती असलेल्या पुस्तिकांचे वाटप करतील. ध्वज आणि कार्यक्रम संबंधित माहिती प्रदर्शित करून तिरंगा ध्वजगीत लावण्यात येणार आहे.
रास्त भाव दुकानातून ध्वज विक्री करण्यात येणार आहे.या दुकानांमध्ये व त्यांच्या सभोवताली पूर्व ध्वनिमुद्रित संदेश,सांगीतिक जाहिराती आणि राष्ट्रध्वजाविषयी माहिती माईकवरून प्रसारित केली जाणार आहे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमाविषयी जाणीव जागृती करून उपक्रमाचा प्रचार - प्रसार करण्यात येणार आहे.शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाला समर्पित विशेष संमेलन, शिबिरे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांच्या पालकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊन " हर घर तिरंगा " या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पालक - शिक्षक सभा घेण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस विभाग विशेष तिरंगा मानवंदना संचलनाचे आयोजन करून पोलीस स्टेशन परिसरात फलक,प्रसिद्धी पत्रके,स्टँडी लावणी व ध्वजारोहण करण्यात येणार आहे.पोलीस वसाहतीमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री व वितरण करण्यात येणार आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर " हर घर तिरंगा " हा संदेश रंगविला जाणार आहे. हा उपक्रम ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
0 Response to "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविणार "
Post a Comment