
पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे - षन्मुगराजन एस.
साप्ताहिक सागर आदित्य/
पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे - षन्मुगराजन एस.
वाशिम - पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.
मान्सूनपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य विभागाने विशेष सतर्क राहावे असे सांगून षन्मुगराजन म्हणाले, जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक तेवढा औषधसाठा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपलब्ध असावा. साथीच्या रोगाबाबत तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. नियंत्रण कक्ष स्थापन करुन आरोग्य पथके सज्ज ठेवावी. वीज वितरण कंपनीने वाकलेले पोल व तारेवरच्या झाडांच्या फांद्या वेळीच तोडाव्यात. दुरुस्ती पथके तैनात करावी. रस्त्यावरील धोकादायक वाळलेली झाडे तोडणे, पीकाच्या नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी तसेच दूरसंचार व्यवस्था या काळात खंडीत होणार नाही यांची दक्षता घेवून संबंधित विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी. असे षन्मुगराजन यावेळी म्हणाले.
शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी, असे सांगून षन्मुगराजन म्हणाले, ज्या गावांना व शहरातील वार्डाना अतिवृष्टीचा धोका पोहचू शकतो, अशा ठिकाणची नालेसफाई 31 मे पूर्वी करण्यात यावी. तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून तेथील दूरध्वनी सुरु असल्याची खात्री करावी. तालुकास्तरावर या काळात सेवाभावी संस्थांची मदत घेण्यासाठी त्याच्या संपर्कात रहावे. अतिवृष्टीमुळे गावांत गावतलावाचे पाणी येणार नाही यासाठी गावपातळीवर उपाययोजना करण्याचे काम गट विकास अधिकारी यांनी करावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व सखाराम मुळे जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आकोसकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, वीज वितरण कंपणीचे कार्यकारी अभियंता रत्नदिप दहीवले, कृषी विकास अधिकारी विकास बंडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सेवाभावी संस्थेचे श्याम सवाई,गजानन मेसरे व आदित्य इंगोले यांची उपस्थिती होती.
0 Response to "पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे - षन्मुगराजन एस."
Post a Comment