
लोकअदालतीत ११ पॅनेलच्या माध्यमातून २३९ प्रकरणे निकाली
साप्ताहिक सागर आदित्य/
लोकअदालतीत ११ पॅनेलच्या माध्यमातून २३९ प्रकरणे निकाली
वाशिम - आज ७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका आणि जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ११ पॅनेलच्या माध्यमातून २३९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.एका प्रकरणात मृताच्या वारसाला विमा कंपनीने आपसी तडजोडीने ९ लक्ष ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली.
जिल्ह्यात आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीत ११ पॅनल ठेवण्यात आली होती.या लोकअदालतीचे अनौपचारिक उद्घाटन न्या.श्रीमती शैलजा सावंत यांनी केले व त्यांनी लोकअदालतीच्या पॅनलला भेट दिली. आजच्या लोकअदालतीमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडील दोन प्रलंबित प्रकरणांसह एकूण ८ हजार ३०० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दुपारी २ वाजेपर्यंत २३९ प्रकरणे निकाली निघाली.
२ ते ६ मे २०२२ या कालावधीत जिल्ह्यात विशेष कलमांतर्गतची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन इतर प्रकारांचा ५११ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली.
या लोकअदालतीमध्ये न्या.एच. एम.देशपांडे यांच्या पॅनलवर मोटार अपघात नुकसान भरपाईची व इतर प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये एका दाम्पत्याचा मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. हे प्रकरण विमा कंपनी व त्या दाम्पत्यामध्ये आपसात तडजोड होऊन या प्रकरणात विमा कंपनीने मयत व्यक्तीच्या वारसाला ९ लक्ष ५० हजार रुपये नुकसानभरपाई दिली.या दाम्पत्याचे न्या. श्रीमती सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
0 Response to "लोकअदालतीत ११ पॅनेलच्या माध्यमातून २३९ प्रकरणे निकाली"
Post a Comment