वाशिममध्ये अवैध सावकारीवर सहकार व पोलीस विभागाची धाड २ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त १३ लाखांची रोकड आणि २ कोटींची ८८ किलो चांदी जप्त
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिममध्ये अवैध सावकारीवर सहकार व पोलीस विभागाची धाड
२ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
१३ लाखांची रोकड आणि २ कोटींची ८८ किलो चांदी जप्त
वाशिम :
वाशिम तालुक्यातील एका नागरिकाने सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून आज, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सहकार आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत लाखाळा परिसरात मोठी धाड टाकली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये दोन पथकांनी संशयितांच्या ठिकाणांची झाडाझडती घेतली. या कारवाईत २ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या घटनेमुळे वाशिम शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त :
राजगाव (ता. जि. वाशिम) येथील मूळ रहिवासी आणि सध्या शंकरबाबा रोड, लाखाळा, वाशिम येथे वास्तव्यास असलेल्या महिला यांच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या वेळी १३ लाख ३०० रुपयांची रोख रक्कम आणि सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे २ कोटी रुपये मूल्याची ८८ किलो चांदी प्रशासनाने जप्त केली.
याशिवाय, अवैध सावकारी व्यवहारांशी संबंधित खरेदीखते, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, करारनामे, कोरे व निनावी धनादेश, कोरे बाँड आणि सावकारी नोंदी असलेली रजिस्टर पुस्तके ताब्यात घेण्यात आली आहेत. सहकार विभागाकडून या सर्व साहित्याची चौकशी केली जात आहे.
#कारवाईच्या स्वरूपाबाबत उपस्थित होणारे मुख्य प्रश्न
१) २ कोटींची चांदी खरेदी करण्यासाठी एवढा मोठा निधी कुठून आणि कसा उपलब्ध झाला, याचा मूळ शोध घेणे आवश्यक बनले आहे.
२) ज्या घरात ८८ किलो चांदी आढळून येते, तिथे सोन्याचे दागिने किंवा दागदागिन्यांचा साठा कसा नव्हता, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
३) या कारवाईदरम्यान काही गोष्टी नजरेआड झाल्या का, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
४) जप्त केलेल्या नोंदी व कागदपत्रांमध्ये आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तींची नावे दडलेली आहेत, हे समोर येणे बाकी आहे.
सदर कारवाई वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि अमरावती विभागाचे सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिमचे जिल्हा उपनिबंधक माणिक लटपटे यांनी पार पाडली.
या मोहिमेत वाशिमचे सहायक निबंधक ईश्वर काबरा आणि मंगरूळपीरचे सहायक निबंधक पी. टी. सरकटे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी काम केले. या पथकात जी. एन. कुकडे, ए. बी. सावंत, एस. पी. सांगळे, रुबीया शेख, व्ही. आर. ढोबळे, भारती इंगळे, परेश राऊत आणि राजकुमार भगत यांचा समावेश होता. नियोजन व व्यवस्थापन सहायक निबंधक (प्रशासन) रवी आकुलवार व प्रतवार पर्यवेक्षक मारोती भेंडेकर यांनी केले.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय राहणार :
अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार विभागाच्या जिल्हा निबंधक (सावकारी) कार्यालयाकडे गोपनीय तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले असून तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0 Response to "वाशिममध्ये अवैध सावकारीवर सहकार व पोलीस विभागाची धाड २ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त १३ लाखांची रोकड आणि २ कोटींची ८८ किलो चांदी जप्त"
Post a Comment