हराळच्या विद्यार्थ्यांची ज्युडोमध्ये दमदार कामगिरी; तीन सुवर्णपदकांसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!
साप्ताहिक सागर आदित्य
🥋 हराळच्या विद्यार्थ्यांची ज्युडोमध्ये दमदार कामगिरी; तीन सुवर्णपदकांसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!
मूर्तिजापूर येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हराळच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे हराळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मूर्तिजापूर येथे झालेल्या अमरावती विभागीय स्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत हराळ येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची छाप पाडत संबंधित वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
🏆 सुवर्णपदक विजेते खेळाडू
🥇 आरोही विजय जेडगे — १४ वर्षे मुली, -४४ किलो वजनगट — प्रथम क्रमांक
🥇 सिद्धी कृष्णा शिंदे — १७ वर्षे मुली, -४० किलो वजनगट — प्रथम क्रमांक
🥇 प्रज्वल दत्तात्रय घनवट — १७ वर्षे मुले, -६० किलो वजनगट — प्रथम क्रमांक
या विद्यार्थ्यांना ज्युडो प्रशिक्षक सौदागर सर तसेच इंगोले सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक सरावाचे, जिद्दीचे आणि मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेते अध्यक्ष आमदार अमितभाऊ झनक व प्राचार्य प्रा. विष्णू एम. राठोड यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक सौदागर सर व इंगोले सर यांचेही कौतुक केले.
हराळच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेचे, शिक्षकांचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल झाले असून हराळ परिसरात या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“मैदानात घाम गाळला, जिद्दीने लढले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले!” असे विचार याप्रसंगी प्राचार्य राठोड सर यांनी व्यक्त केले.
0 Response to "हराळच्या विद्यार्थ्यांची ज्युडोमध्ये दमदार कामगिरी; तीन सुवर्णपदकांसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!"
Post a Comment