दुष्काळसदृश परिस्थितीवरील उपाययोजनांना गती द्या केंद्रीय पथकाच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश
साप्ताहिक सागर आदित्य
🌾 दुष्काळसदृश परिस्थितीवरील उपाययोजनांना गती द्या
केंद्रीय पथकाच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश
📍 वाशिम |
भारत सरकारचे केंद्रीय पथक दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यास भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागनिहाय अद्ययावत माहिती, आकडेवारी, अभिलेख व सादरीकरण तयार ठेवून आवश्यक पूर्वतयारी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील काटपूर्णा सभागृहात जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त डॉ. बाबूराव बिक्कड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
🔹 केंद्रीय पथकाच्या भेटी नियोजित गावांतील पंचनामे व अभिलेख अद्ययावत ठेवावेत. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक माहितीची पडताळणी करावी, असे कुंभेजकर यांनी सांगितले.
🔹 पीक पंचनाम्याच्या कार्यवाहीला गती देऊन जास्तीत जास्त क्षेत्राचे पंचनामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावेत. पिकनिहाय व गावनिहाय प्रत्यक्ष पडताळणी अहवाल (ग्राऊंड ट्रुथिंग रिपोर्ट) संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करावा.
🔹 पिक कापणी प्रयोगामध्ये सहभाग नोंदविला नसल्यास संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर उपस्थित राहून पिक कापणी प्रयोग करून घ्यावा, असे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी निर्देश दिले.
🔹 प्रकल्पांमधून होणाऱ्या अवैध पाणी उपशाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. नियुक्त पथकांकडून अवैध उपशाच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होत आहे किंवा नाही, याची तपासणी करावी.
🔹 रात्रीच्या वेळी वीजतारांवर आकडा टाकून अवैध वीजजोडणीद्वारे पाणी उपसा होत असल्याच्या बाबींची महावितरण विभागाने आवश्यक तपासणी करून कार्यवाही करावी, असे कुंभेजकर यांनी सांगितले.
🔹 दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने सरपंच व गावपातळीवरील संबंधित कर्मचाऱ्यांची तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन गावातील परिस्थितीचा आढावा घ्यावा. उपाययोजना व नियोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा.
💧 ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी नागरिकांसाठी पाणी आरक्षणाची मागणी संबंधित यंत्रणेकडे कळविली होती. आता दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने नागरिकांसह पशुधनासाठी आवश्यक पाणी आरक्षणाची मागणी तातडीने करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले.
🔹 VB-G-RAM-G अंतर्गत मंजूर कामांची संख्या कमी झाल्याने रोजगार सेवकांची बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घ्यावा व आवश्यक कार्यवाही करावी.
🔹 VB-G-RAM-G अंतर्गत जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणांकडील कामांची संख्या वाढवावी. जलसंधारण विभाग व ग्रामपंचायतींकडील घेता येणाऱ्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक कामांचे नियोजन करावे आणि अपेक्षित प्रगती सुनिश्चित करावी.
🔹 VB-G-RAM-G अंतर्गत ज्या संबंधित यंत्रणांकडील कामांची संख्या शून्य आहे, त्या यंत्रणांना कामांचे नियोजन सादर करण्याबाबत कळवावे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी संबंधित यंत्रणांच्या कामांचा नियमित आढावा घ्यावा.
🔹 शेल्फवरील दुष्काळ प्रतिबंधात्मक कामांची संख्या वाढवून त्यानुसार आवश्यक कामांचे नियोजन करावे.
🌱 चारा पिकांच्या लागवडीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून नियमित पाठपुरावा करावा. चारा पिकांच्या बियाण्यांसाठी निधीची आवश्यकता लक्षात घेता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी आवश्यक बियाण्यांचे प्रमाण निश्चित करून निधी मागणीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी, असे कुंभेजकर यांनी सांगितले.
🔹 कर्ज पुनर्गठनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
#वाशिम #दुष्काळसदृशपरिस्थिती #दुष्काळदेखरेख #केंद्रीयपथक #पीकपंचनामे #ग्राऊंडट्रुथिंग #पाणीआरक्षण #रोजगारहमी #चारा #जिल्हाप्रशासन
0 Response to "दुष्काळसदृश परिस्थितीवरील उपाययोजनांना गती द्या केंद्रीय पथकाच्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश"
Post a Comment